लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, आय.टी.डी.पी., स्मार्ट सिटीज मिशन स्वच्छ भारत आणि फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या वतीने आयोजित स्ट्रीट फार पीपल चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडतर्फे शहरातील विविध बाजारपेठा, रस्त्यावर वॉकिंग ऑडिट करण्यात आले.
स्ट्रीट फार पीपल चॅलेंज आर्किटेक्ट, शहरी नियोजन आणि अन्य क्षेत्राच्या विद्यार्थ्यांसाठी व व्यावसायिकांसाठी मोठी संधी आहे. याच्या माध्यमाने ते आपल्या स्वत:ची डिझाईन आणि संकल्पनेचा विचार करून नागरिकांसाठी सुविधाजनक रस्ते तयार करू शकतात. पायी चालणाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणे, हा याचा उद्देश आहे. या उपक्रमाला नागरिकांचे सहकार्य मिळाले. पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर यांच्या नेतृत्वात व स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात स्ट्रीट फार पीपल चॅलेंज स्पर्धा आय.डी.टी.पी.च्या माध्यमाने ऑनलाईन आयोजित करण्यात आली. स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांतील ५० चमूंनी भाग घेतला होता. यात आर्किटेक्ट, शहरी नियोजन आणि आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी यांचा समावेश होता.
या वॉकिंग ऑडिटमध्ये ‘फ्लॅगशिप इंटरव्हेन्शनसाठी" सीताबर्डी आणि महाल रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच "नेबरहूड इंटरव्हेनशन" साठी ट्रॅफिक पार्क आणि सक्करदरा तलावाच्या समोरचा भाग निवडला आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे त्यांनी कोणत्याही एका साईटची निवड करून त्यासाठी डिझाईन तयार करायची आहे. स्मार्ट सिटीच्या चमूंनी वॉकिंग ऑडिट करून त्यातील समस्या, सामर्थ्य आणि भागधारकांच्या अपेक्षेबद्दल आपले मत दिले आहे. वॉकिंग ऑडिटची सुरुवात उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. प्रणिता उमरेडकर, महाव्यवस्थापक पर्यावरण, राहुल पांडे, मुख्य नियोजक, अमित शिरपुरकर, पराग अर्मल, हर्षल बोपर्डीकर, स्मृती सावणे, प्राची पानसरे आणि सुप्रिया बचाले यांनी यात सहभाग घेतला. आर्किटेक्ट, स्थानिक दुकानदार, संभाव्य खरेदीदार इत्यादींनी आपले मत नोंदविले.