लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. सुरुवातीच्या कागदोपत्री मूल्यांकनात नागपूर शहर देशभरात टॉपवर होते. मात्र प्रत्यक्ष कामाचे मूल्यांकनाला सुरुवात झाल्यानंतर ४४ व्या क्रमांकावर घसरले आहे. विशेष म्हणजे नागपूर राज्यातील पुणे, नाशिक, ठाणे व पिंपरी चिचवड या शहरांच्याही मागे पडले आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशातील १०० शहरात पहिल्या क्रमांकासह नागपूर टॉपर होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. मे महिन्यात २८ व्या क्रमांकावर खाली आले. तर जानेवारी २०२१ मध्ये जारी करण्यात आलेल्या स्मार्ट शहराच्या यादीत नागपूर तब्बल ४४ व्या क्रमांकावर घसरले आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील विकास प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात अपयश आल्याने नागपूर शहराचे रँकिंग खाली आले आहे. हे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे अपयशच म्हणावे लागेल.
रँकिंगसाठी विविध प्रकारचे निकष गृहीत धरण्यात येतात. यात स्मार्ट सिटी प्रकल्पावरील खर्च, प्रकल्पाची प्रगती, कार्यादेश, निविदा प्रक्रिया, प्राप्त निधीचा खर्च व महापालिकेचा परफाॅर्मन्स अशा बाबींचा यात समावेश असतो.
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी सीईओ पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा नागपूर २८ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर सुधारणा होत २३ व्या क्रमांकावर आले होते.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या पुणे शहराचा देशात १८ क्रमांक आहे. नाशिक २०, ठाणे २३, पिंपरी चिंचवड ४१ असून नागपूरच्या तुलनेत या शहरांनी चांगली कामगिरी केली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गंत शहरात विविध प्रकारचे प्रकल्प राबविले जात आहेत. यात प्रोजेक्ट टेंडर शुअर प्रकल्प पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात उभारला जात आहे. ६५० कोटींचा हा प्रकल्प आहे. होम स्वीट होम हा २२० कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
मार्च २०१८ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प आहे. यात नागपूर सेफ अँड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट टेंडर शुअर व प्रोजेक्ट होम-स्वीट-होम या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग, नागपूर पोलीस आयुक्तालय व स्मार्ट अँड सस्टेनबल सिटी डेव्हलमेंट कॉर्पाेरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ अँड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट राबविला जात आहे.
स्मार्ट सिटी परफॉर्मन्स
मार्च २०२०- प्रथम क्रमांक
मे २०२०-२८ वा क्रमांक
जानेवारी २०२१-४४ वा क्रमांक