लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी म्हणजे रस्ते, ब्रिज, कार्यालयाची लगबग आणि वाहनांची गजबज नाही. मुलांच्या संकल्पनेत भविष्यातील शहरात प्रत्येक गोष्ट जागतिक दर्जाची असली पाहिजे. रिंगरोडप्रमाणे शहराच्यावर धावणारी मेट्रो, अर्धवट जोडलेले आणि जलऊर्जा (हायड्रोलिक पॉवर), सौरऊर्जेने उघडणारे ब्रिज, स्क्रीन लागलेल्या चकचकीत इमारती, रस्ते, स्मार्ट सिग्नल, रुग्णवाहिकेला सहज मार्ग निघेल अशी व्यवस्था... कुणाला प्रत्येक घरात वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम हवी तर कुणाला वेस्ट मॅनेजमेंटची स्मार्ट व्यवस्था हवी. मात्र यासोबतच ठिकठिकाणी हवी आहेत उद्याने, जैवविविधता सांभाळणारे पार्कही येथे हवे आहेत. ही केवळ कल्पना नाही तर विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मॉडेल्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष शक्यतेची हमी दिली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार महोत्सवांतर्गत माय सायन्स लॅब आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने महिला महाविद्यालय, नंदनवन येथे तीन दिवसीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे गुरुवारी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झाले. याप्रसंगी एकल विद्यालय फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी देव गुप्ता, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संदीप राठोड, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रवी देव गुप्ता यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले. शिक्षित मुले ही कौशल्यपूर्ण भारताचा कणा असल्याचे सांगत, शिक्षणामुळेच ती स्वत:चा, समाजाचा आणि भारताचा आर्थिक विकास साधू शकतील. मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना पालकांनी सन्मानाची वागणूक द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक माय सायन्स लॅबचे अध्यक्ष धनंजय बालपांडे यांनी केले. लॅबचे सहसंस्थापक अविनाश गायकवाड यांनी आभार मानले. विज्ञान महोत्सवात नागपूरसह विदर्भातील ८० शाळांमधून वर्ग ५ ते १० च्या हजार विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या मॉडेलसह सहभाग घेतला. विविध शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी विज्ञान महोत्सवाला भेट दिली. डॉ. तनुजा नाफडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. माय सायन्स लॅबतर्फे क्वीझ स्पर्धा व विज्ञानावर आधारित खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. विज्ञान प्रदर्शन हे या महोत्सवाचे आकर्षणाचे केंद्र होते. स्मार्टसिटी कशी असावी, हे दर्शविणारे १५ च्यावर प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. याशिवाय अपघातमुक्त रेल्वे क्रॉसिंग, सर्व प्रकारचा एकत्रित कचरा वेगवेगळा करून संबंधित रिसायकल केंद्रावर पाठविणारे मॉडेल, सौर उर्जेवर चालणारा ट्रॅक्टर, घरी नसतानाही झाडांना आवश्यक पाणीपुरवठा करणारे तंत्र, पायडल लागलेली कार, कॉर्बनचे उत्सर्जन कमी करणारे तंत्रज्ञान, सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्टचे मॉडेल, अपघात रोखण्यासाठी दोन गाड्यांमधील सुरक्षित अंतराचा अलर्ट देणारे डिवाईस अशा शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून साकार झालेले १०० च्यावर प्रकल्पांचे मॉडेल्स प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहेत. आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत जांभुळघाट शाळेचे जलउर्जा प्रकल्प निर्मिती केंद्राचे प्रोजेक्ट, कडीकसा शाळेतर्फे टाकाउ प्लास्टिक बॉटेल्सपासून घरघुती उद्यान निर्मिती व बोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मॉडेल लक्षवेधी ठरले आहेत. केवळ नेहमीचे मॉडेल ठेवण्यापेक्षा रोजगाराभिमूख प्रकल्प निर्मिती करणे, ही या महोत्सवाची विशेष संकल्पना होती.
रॉकेट लाँचरने शेतात फवारणी शिर्षक ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण राजेंद्र हायस्कूलच्या खुशाल देवगडे या विद्यार्थ्याने तयार केलेला हा प्रकल्प प्रदर्शनात येणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधत होता. हवा भरण्याच्या पंपद्वारे प्रेशर निर्माण करून द्रव भरलेली बॉटल रॉकेटप्रमाणे हवेत फेकली जात असताना प्रत्येकजन आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. या बॉटलला छिद्र पाडलेली दुसरी बॉटल जोडून त्यात किटनाशक भरून ते शेतात फवारणी केले जाउ शकण्याची शक्यता खुशालने व्यक्त केली. त्यानेच तयार केलेला ठिबक सिंचनाचा प्रकल्प लक्षवेधी होता. अचानक पाउस आल्यास बाहेर साठवलेल्या धान्यावर निव्वळ पाण्याच्या सेंसरने आपोआप पॉलिथीन कव्हर करण्याचा त्याचा प्रकल्पही शेतकऱ्यांसाठी लाभदायक असाच आहे.
गाडी चालविताना झोपणाऱ्या ड्रायव्हरला जागे करणारा चष्मा वाहन चालविताना कधीकधी अत्याधिक थकव्याने वाहन चालकाला झपकी येण्याचे प्रकार होतात व त्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. पण पापण्या बंद झाल्यास अलर्ट देणारा चष्मा विज्ञान प्रदर्शनातील आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. गेट ब्रिटन हायस्कूल, शांतिनगरच्या तनेश भोंगाडे व आदित्य जैस्वाल या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग सादर केला. चष्म्याला लावलेले सेंसर विशिष्ट अंतरावर असलेल्या वस्तुंच्या हालचालीवरून हा अलर्ट देण्याचे तंत्र त्यात आहे. पापण्यांच्या हालचालीवर केंद्रीत सेंसारला अधिक काळ त्या बंद आढळल्यास बजर वाजेल आणि चालक जागा राहिल, असे हे तंत्र. हे मॉडेल पेटंटसाठी दिल्याचे शिक्षकांनी सांगितले. याशिवाय वाहनाच्या अत्याधिक दारू पिल्यास त्या गंधाने गाडी बंद पाडण्याचे सेंसार असलेले या दोघांचे मॉडेलही लक्ष वेधणारे होते.