बेलाेना : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट काॅटन उपक्रमांतर्गत बेलाेना (ता. नरखेड) येथील सुधीर बारमासे यांच्या शेतात शेतीशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. यात शेतकऱ्यांना कपाशी, साेयाबीन व संत्र्यांवरील विविध किडी व राेगांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
हल्ली कपाशीवर गुलाबी बाेंडअळी, साेयाबीनवर खाेडमाशी व येल्लाे माेझॅक आणि संत्रा व माेसंबीवर ब्राऊर राॅट या किडी व राेगांचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या किडी व राेगांचे याेग्य वेळी, याेग्य व्यवस्थापन करून पिकांचे संरक्षण करण्याबाबत तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगीराज जुमडे यांनी शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मंडल कृषी अधिकारी सोपान लांडे, कृषी पर्यवेक्षक बांबल, कृषी सेवक अमरदीप रामटेके, रणजित खळतकर, अमरदीप गजभिये, महिला बचत गटाच्या मीनाक्षी सातपुते, सोनल बन्सोड, शेतकरी गटाचे अनिल डोईफोडे यांच्यासह शेतकरी व महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.