नागपूर : वर्धा रोडवरील क्रिपलानी चौकात, जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ व सेंट्रल बाजार रोडवर स्टेनलेस स्टीलचे छोटेछोटे आऊटलेट सारखे ई-टॉयलेट अनेक महिन्यांपासून उभे आहेत. पण ते बंद असल्याने रस्त्यावरून येणारे जाणारे, बसस्टॅण्डवर थांबलेले प्रवासी आडोसा बघून स्मार्ट ई-टॉयलेटच्या मागेच लघुशंका करीत आहेत. हे ई-टॉयलेट फुल्ली ऑटोमॅटिक असून, ८ लाख रुपयांचे एक टॉयलेट असल्याची माहिती आहे. उघड्यावर पडले असल्याने, त्याचा उपयोग नसल्याने, एखाद्या उपद्रवीकडून त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने नागपूर स्मार्ट सिटीने शंभर ई-टॉयलेट शहराच्या विविध भागांत उभे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील सहा टॉयलेट क्रिपलानी चौक, जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन व रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोड उभे करण्यात आले आहेत. पण तेही नागरिकांसाठी अद्याप खुले करण्यात आले नाही. एका ई-टॉयलेटची किंमत ८ लाख रुपये असल्याची माहिती आहे. जे ६ टॉयलेट उभे केले आहेत तेही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. इतर ई-टॉयलेटसाठी अद्यापही जागा मिळालेली नसल्याचे सांगण्यात येते. या उभ्या करण्यात आलेल्या ई-टॉयलेटच्या मागे रात्रीला आडोस बघून लोक दारू पितात. अनेक जण ई-टॉयलेटच्या मागे लघुशंकेला जातात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
- उभे केलेले टॉयलेट गडर लाइनला कनेक्ट नाही
कृपलानी चौक व जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ एका काँक्रीटच्या बेसवर उभे केलेले ई-टॉयलेट अजूनही गडर लाइनशी कनेक्ट केलेले नाही. टॉयलेटच्या बाजूला खोदकाम केले आहे. पण बऱ्याच महिन्यापासून ते तसेच पडलेले आहे. काहीतरी वेगळे दिसत असल्याने अनेक जण ई-टॉयलटेश छेडछाड करतात. विशेष म्हणजे ज्या कंपनीकडून हे खरेदी केले आहे. ती कंपनी एक वर्ष त्याचे मेंटनन्स मोफत करणार आहे. उभे केलेले टॉयलेट सुरूच झाले नसल्याने देखभाल दुरुस्तीचा प्रश्नच येत नाही.
- ई-टॉयलेटची वैशिष्ट्ये
१) स्टेनलेस स्टीलने तयार ई-टॉयलेटमध्ये स्वयंचलित यंत्रणेचा वापर.
२) वॉश बेसिनसह उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर.
३) ३०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी.
४) कॉइन टाकल्यानंतरच आत जाता येईल.
५) ई-टॉयलेटबाहेर डिस्प्ले असून आतमध्ये कुणी असल्यास लाल रंगाचा दिवा, तर कुणीही नसल्यास हिरव्या रंगाचा दिवा लागतो.
६) स्वच्छतेसाठी स्वयंचलित फ्लश
७) स्वयंचलित फ्लोअर क्लिनिंग प्रणाली
८) ई-टॉयलटेमध्ये अल्ट्रा व्हायलेट निर्जंतुकीकरण प्रणाली आहे.
- महापालिकेतून नियंत्रण
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील सातव्या माळ्यावरून या ई-टॉयलेटवर नजर ठेवली जाणार आहे. सातव्या माळ्यावरील सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये या ई-टॉयलेटवर लक्ष ठेवण्यासाठी डॅशबोर्ड व इतर सेटअप उभे करण्यात येत आहे.