नागपूर : गौरवशाली इतिहास असलेल्या संत्रानगरीच्या नगर प्रशासनाला १५१ वर्षे पूर्ण होत आहेत. याचा सोहळा सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नगर प्रशासनाच्या या ऐतिहासिक वाटचालीत अनेक चांगले-वाईट अनुभव अनुभव आले. पूर्वी बैलबंडीतून प्रवास करावा लागत होता. आज स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागपुरात कनेक्टीव्हीटी वाढली आहे. नागपूरकर लवकरच मेट्रोतूनही प्रवास करणार आहेत. महापालिका प्रशासनाच्या इतिहासात हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे. संत्रानगरीची ही स्मार्ट भरारी शहराचा चेहरामोहरा बदलविणार आहे. यानिमित्ताने शहराच्या स्थापनेपासून टाकलेला हा दृष्टीक्षेप१८६४ साली नगरपालिका कायदा करण्यात आला. नागपूर नगरपालिका अस्तित्वात आली. १७ गैरसरकारी सदस्यांची निवडणूक झाली. परंतु कर देणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार होता. १९२२ साली नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यावेळी १ लाख ३४ हजार लोकसंख्या होती. आज ती २५ लाखांवर गेली आहे. कायद्यातही बदल झाला. शहराच्या उभारणीत गोंड राजे बख्त बुलंदशहा व भोसले यांचा मोठा वाटा आहे. १९६४ साली १०० वर्षे झाल्यानिमित्ताने राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते नागपूर नगर संस्था शताब्दी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. १५१ वर्षे झाल्याने मुखर्जी यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. (प्रतिनिधी)
संत्रानगरीची स्मार्ट भरारी
By admin | Published: September 14, 2015 2:55 AM