कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी-कधी घराच्या बाहेर असताना अचानक लक्षात येते की, आपण घरातील लाईट, टीव्ही किंवा अन्य दुसरे विजेचे उपकरण बंद करायला विसरलो. सध्याच्या परिस्थितीत अशी वेळ आल्यास आपण काहीच करू शकत नाही. परंतु, येणाऱ्या काळात हे चित्र पालटणार आहे. आपल्याला बाहेर राहूनही अॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार आहे.ही करामत स्मार्ट मीटरमुळे शक्य होणार आहे. वीज वितरण फ्रेन्चायसी एसएनडीएल कंपनीने देशामध्ये पहिल्यांदा ही संकल्पना आणली आहे. प्रायोगिकस्तरावर चंदननगर येथील २५० घरांमध्ये स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. दिवाळीनंतर हे काम सुरू होईल. सध्या शहरात डिजिटल मीटर लागले असून त्याची किंमत १२०० रुपये आहे. स्मार्ट मीटरची किंमत त्यापेक्षा ३००० रुपयांनी अधिक राहणार आहे. स्मार्ट मीटरला अॅपशी जोडले जाईल. कंपनी प्रायोगिक मीटर लावण्यासाठी पैसे घेणार नाही व मीटरशी जोडणारे अॅपही ग्राहकाच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून दिले जाईल. त्या अॅपद्वारे ग्राहकाला कुठूनही घरातील वीज पुरवठा बंद करता येईल. तसेच, त्याला विजेच्या उपयोगाची माहिती मिळू शकेल. विजेचे बिलही अॅपवर येईल.
वीज चोरी नियंत्रणात येईलस्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवले जाईल. या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचेल. विजेचे आॅडिट करता येईल. वीज चोरीची माहिती तात्काळ मिळू शकेल. मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही.
आधुनिक सुविधास्मार्ट मीटरच्या कार्यावर एक महिन्यापर्यंत लक्ष ठेवले जाईल. यादरम्यान जुन्या मीटरवरील रिडिंगनुसारच बिले पाठविले जातील. सकारात्मक परिणाम आल्यानंतर संपूर्ण शहरात स्मार्ट मीटर लावले जातील. याद्वारे नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होईल. वीज चोरीवर अंकुश लागेल.- सोनल खुराणा,बिझनेस हेड, एसएनडीएल.