मुकेश कुकडे-विशाल महाकाळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणारे पाणी वाहून जावे व त्यांचा सहजपणे निचरा व्हावा यासाठी सिमेंट रस्त्यांच्या कडेला ड्रेनेज लाईन्स टाकण्यात आल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’चा दावा करणाऱ्या प्रशासनाची या लाईन्सवरील झाकणांच्या तुटलेल्या स्थितीमुळे पोलखोल होत आहे.
प्रतापनगर, रविनगर, धरमपेठ, रविनगर, चिखली चौक, गांधीनगर इत्यादी भागात रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईन्सची काही झाकणे अनेक दिवसांपासून तुटलेली आहेत. काही ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या ठेल्यांच्या भारामुळे ही झाकणे तुटली आहेत. काही ठिकाणी तर या लाईन्सची खोली सहा फुटांपर्यंत आहे.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक चालता चालता यात पडले तर यामुळे जीवाचाच धोका संभवतो. पावसाळ्यात तर आणखी दुरवस्था असते व धोक्याची पातळी आणखी वाढते. याशिवाय काही मार्गांवरील गटाराची झाकणेदेखील तुटलेली आहेत.
याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रार केली जाते. मात्र, प्रशासन ढिम्मच. हा धोका कधी मिटणार व एखादा व्यक्ती ड्रेनेज लाईनमध्ये पडून गंभीर झाल्यावरच मनपा प्रशासनाचे डोळे उघडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेच का ते 'स्वच्छ-सुंदर' नागपूर..?
नागपूरला स्वच्छ आणि सुंदर नागपूर बनविण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर उतरताच मात्र प्रवाशांना हेच सुंदर नागपूर आहे का, असा प्रश्न पडत आहे. नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ म्हणजे होम प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर प्रवाशांना भला मोठा कच-याचा ढिगारा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागपूर शहरात आलेल्या प्रवाशांना संपूर्ण शहरातही अशीच दुर्गंधी असेल, असा भास निर्माण होत आहे.