नागपूर : मध्य भारतातील शैक्षणिक केंद्र म्हणून नागपूरने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आहे. गेल्या तीन वर्षांत नागपूरसाठी ‘ट्रीपल आयटी’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅप इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी या संस्थांनादेखील मंजुरी मिळाली. आता तर व्यवस्थापन शिक्षणातील अग्रणी संस्था ‘आयआयएम’देखील (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) सुरू झाली आहे. उपराजधानीला ‘स्मार्ट सिटी’ करण्यासाठी या सर्व गोष्टी नक्कीच फायदेशीर होणार आहेत व जागतिक नकाशावर शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. परंतु यातील बहुतांश संस्था या अद्यापही कागदांवरच आहेत. शिवाय शहरातील इतर महाविद्यालयांना ‘स्मार्ट’ करण्यासाठीदेखील हालचाली करण्याची आवश्यकता आहे. बारावीनंतर हवेत ‘स्मार्ट’ पर्यायबारावीनंतर नागपुरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. २०१५ साली एकट्या नागपूर शहरातून ३४ हजार ७७१ पैकी ९३.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु यापैकी अनेक विद्यार्थ्यांची धाव ही काही मोजक्या नामांकित महाविद्यालयांकडेच होती. तिथे प्रवेश मिळाला नाही,म्हणून इतर महाविद्यालयांत नाईलाजाने त्यांना प्रवेश घ्यावा लागला. मुळात नागपूर शहर हे मध्य भारतातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असूनदेखील विद्यार्थ्यांना बारावीनंतर फारसे ‘स्मार्ट’ पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अत्याधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर मोठी शहरे गाठावी लागतात. संशोधनावर भर कधी देणार?नागपूर शहरात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एकूण २३४ महाविद्यालये आहेत. परंतु अनेक पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये काही अपवाद वगळता तंत्रज्ञानाचा म्हणावा तसा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थी पदवीधर तर होतात, परंतु प्रात्यक्षिक ज्ञान व कौशल्य यांच्याबाबतीत ते मागे असतात. विज्ञान महाविद्यालयांमध्ये तर संशोधनावर भर देण्याची जास्तीत जास्त आवश्यकता आहे. परंतु बोटावर मोजण्याइतपत महाविद्यालयांतच संशोधन कार्य चालते.रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची कमतरतानागपूर शहरात महाविद्यालयांची भरमार असली तरी प्रत्यक्षात पदवी शिक्षण झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करु शकणाऱ्या अभ्यासक्रमांची कमतरताच आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये असलेल्या रोजगाराभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रमांची गरज भासू लागली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अगदी घरकाम करणाऱ्यांपासून आॅटोवाल्यांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठातदेखील कौशल्याधारित अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे. विशेषत: मोबाईल रिपेअरिंग, सलून टेक्नॉलॉजी, हार्डवेअर मेन्टेनन्स, ग्राफीक डिझायनिंग मीडिया मॅनेजमेंट यासारखे प्रत्यक्ष रोजगार देणारे अभ्यासक्रम पदवीस्तरावर तयार करायला हवेत. काही खासगी संस्थांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे शुल्क हे सामान्य विद्यार्थ्यांना परवडण्याजोगे नाही.(प्रतिनिधी)
‘स्मार्ट’ शिक्षणप्रणाली कागदावरच नको
By admin | Published: October 30, 2015 3:01 AM