जलालखेडा : नरखेड तालुक्यातील खापा (घुडन) या ग्रामपंचायतला आर. आर पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत स्मार्ट ग्रामचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत स्व. आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरित करण्यात आला. सरपंच प्रमोद बन्नगरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गावामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. यात शौचालय, वृक्ष लागवड, पाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतचे सुशोभिकरण, स्वच्छ सुंदरगाव, नाली सफाई, आरोग्य या कामाचा यात समावेश आहे. खापा (घुडन) या ग्रामपंचायतने उपरोक्त उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्यामुळे तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून शासनातर्फे गावाच्या विकासासाठी १० लाख रुपयाचा निधी मिळणार आहे. या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, शिक्षण सभापती भारती पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नरखेड पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, नरेश अरसडे, पुरस्कार विजेते सरपंच प्रमोद बन्नगरे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
खापा (घुडन) ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:12 AM