लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील दहा-बारा दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने मंगळवारी नागपूरसह विदर्भात सर्वदूर धुंवाधार हजेरी लावली. हवामान विभागाने चार दिवसांपूर्वी विदर्भात वातावरण बदलण्याचा व ढगांच्या गडगडाटासह विदर्भात पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. त्यानुसार मंगळवारी दुपारनंतर चांगल्याच सरी बरसल्या. नागपूर शहरात १७.१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली हाेती तर उष्णता वाढल्याने नागरिकही त्रस्त झाले हाेते. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत केवळ २५ मिमी पावसाची नोंद झाली. नागपुरात सकाळी आकाश माेकळे हाेते पण दुपारी अचानक वातावरण बदलले आणि गडगडाटासह पावसाच्या सरी काेसळल्या. ही धुंवाधार दाेन तास सुरू हाेती. त्यानंतर काही वेळाची उसंत घेत सायंकाळी पुन्हा जाेरदार हजेरी लावली. पावसाची ही संततधार रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. दिवसभराच्या दमदार पावसामुळे अनेक शहरातील सखल वस्त्यांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी साचले. नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. आजच्या पावसामुळे तापमानात ३.७ अंशाची घट झाली व ते २९.५ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. पुढचा आठवडाभर असेच पावसाचे वातावरण राहणार असून तीन दिवस येलाे अलर्टसह सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक दिवस पावसाच्या विश्रांतीने शेतकऱ्यांची चिंता वाढविली हाेती, पण मंगळवारच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. हा पाऊस साेयाबीन व कापसाला संजीवनी ठरेल, असे मानले जात आहे.