ऑनलाईन लोकमतनागपूर : कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्पाईस जेट विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी २.०५ आकस्मिक लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव वाचले.प्राप्त माहितीनुसार, स्पाईस जेटचे ६० ते ७० सीटचे विमान (टर्बो जेट) हैदराबाद येथून जबलपूरला जात आहे. विमानाने उड्डाण भरल्यानंतर काहीच वेळात कॉकपिटमधून धूर येत असल्याचे वैमानिकाच्या ध्यानात आले. धूर विमानात हळूहळू पसरू लागला. वैमानिकाने परिस्थिती पाहून विमान नागपूर विमानतळावर उतरविण्याची परवानगी मागितली. ती त्यांना मिळाली. त्यांनी विमान तातडीने विमानतळावर उतरविले. विमान विमानतळालगतच्या ‘टॅक्सी-वे’वर उभे करण्यात आले. लगेचच विमानाची दारे उघडण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. धुरातून बाहेर निघत प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याचवेळी अग्निशमन गाड्या ‘टॅक्सी-वे’वर पोहोचल्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून बाहेर येण्यास मदत केली. सध्या विमान ‘टॅक्सी-वे’वर उभे आहे. रात्रीपर्यंत कंपनीचे इंजिनिअर्स विमानाच्या दुरुस्तीसाठी नागपुरात पोहोचले नाहीत.सर्व प्रवाशांना टर्मिनलमध्ये बसविण्यात आले आणि त्यांना चहा व नाश्ता देण्यात आला. रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी बसून होते. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जबलपूरला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.