नागपूर : जाफरनगर येथील मंशा चौकापुढच्या एका खासगी बाल रुग्णालयापुढे सर्रास धुम्रपान केले जात आहे. संबंधित ठिकाणी चहा टपरी आहे. परंतु, तेथे खास सिगारेट मिळत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दूरदूरचे व्यक्ती धुम्रपानासाठी येथे गोळा होतात.
धुम्रपान करणारे कोरोना नियमांचे पालन करीत नाही. कुणीही मास्क घालत नाही आणि शारीरिक अंतर ठेवत नाही. रुग्णालयात येणाऱ्या आजारी मुलांना व त्यांच्यासोबतच्या पालकांना त्या वातावरणापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगावी लागते. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे, पण अद्याप कारवाई झाली नाही अशी माहिती मिळाली.
जाफरनगरमध्ये कोरोना संक्रमणाने पाय पसरले होते. असे असताना या परिसरात नियमांचे उल्लंघन करून गोळा होणाऱ्या लोकांवर नियंत्रण का आणले जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. चहा टपरीला कुणाचेतरी संरक्षण असल्याचे बोलले जात आहे. चहा टपरीजवळ औषधाचे दुकान आहे. यासह परिसरातील अन्य दुकानांत महिला कर्मचारी आहेत. रविवारी सर्दी व खोकला झालेल्या काही मुलांना रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, काही पालकांनी चहा टपरीवरील धुम्रपानावर आक्षेप घेतला. या दुकानावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, टपरीवरील धुम्रपान बंद करण्याची मागणी केली.