शफी पठाण।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शीर्षकातील आर्ई आणि ग्रेस हे शब्द वाचकांना नवीन नाहीत. ‘ती गेली तेव्हा...’ ही कविता लिहून स्वत: ग्रेसांनीच या दोन शब्दांमधील एकरूपता स्वहस्ताक्षरात नमूद करून ठेवली आहे. पण, या दोन शब्दांमध्ये ‘ताजबाग’ कसे आले हा प्रश्न मात्र वाचकांना अस्वस्थ करू शकतो. पण, आई इतकेच ताजबागही ग्रेसांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते. ही अविभाज्यता इतकी की आई गेल्यावर ताजबागमधल्या लोभानभरल्या वाऱ्यात त्यांना आईचा गंध जाणवायचा. म्हणूनच तर ‘दुर्बोधतेची बेसरबिंदी’ अभिमानाने ललाटावर मिरवणारा हा शब्दसखा दर गुरुवारी सकाळी न चुकता ताजबागला जायचा आणि आईच्या अस्तित्वाचे आभासी क्षण आेंजळीत साठवून पुन्हा धंतोलीतील आपल्या गूढ गुहेत परतायचा. या संध्यामग्न पुरुषाच्या कवितेची प्रेरणा ही अशी सकाळच्या ताजबाग भेटीत दडलेली असायची. काही लोक या भेटीकडे धार्मिक चष्म्यातून बघायचे आणि दबक्या आवाजात टीकाही करायचे. कारण, त्यांना दिसायचे फक्त ताजबाग. त्या दर्ग्याआडून ग्रेसांना खुणावणारी आई त्यांना दिसायचीच नाही. म्हणूनच ग्रेसांचे हे ताजबागप्रेम आजही गे्रसांइतकेच दुर्बोध बनून राहिले आहे. पण, ग्रेस उगाच ताजबागला जात नव्हते. त्याचीही एक रंजक कथा आहे. ग्रेसांचे कुटुंब कर्नलबागेत राहायचे. हजरत बाबा ताजुद्दीन जिवंत असतानाचा हा काळ होता. ग्रेसांची आई बाबांच्या दर्शनाला गेली असता बाबांनी तिच्या अंगावर त्यांच्या शेजारी पडलेला झब्बा फेकला होता. तो झब्बा त्यांच्या आईने प्रसादाच्या रूपात स्वीकारून घरी आणला आणि त्या कायमच्या ताजभक्त झाल्या. काळाने कूस बदलली आणि ग्रेसांची आई ढगाआड निघून गेली. ग्रेस मात्र नित्यनेमाने ताजबागला जात राहिले, आई शोेधत राहिले आणि दरवेळी तिच्या कुशीची ऊब मिळाल्यागत आनंदाने आत्म्यावरची धूळ झटकून आपल्या कवितेद्वारे प्रतिभा-रूपाचा नित्यनवा साक्षात्कार घडवित राहिले. पण, २६ मार्च, २०१२ साली साक्षात्काराची ही मालिका थांबली. शब्दकोषांना नवे शब्द देणारा शब्दप्रभूही आईच्या शोधात ढगाआड निघून गेला. पण, ग्रेस नेहमी म्हणायचे वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. बघा...नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. ओल्या वेळूची बासरी,कावळे उडाले स्वामी ,चंद्रमाधवीचे प्रदेश, चर्चबेल, मितवा, वाऱ्याने हलते रान, सांध्यपर्वातील वैष्णवीच्या पानापानातून ग्रेस जगताहेत. जगतच राहणार आहेत...