लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुचर्चित झिरो डिग्री बारमध्ये अमली पदार्थाचे तस्कर आणि गुन्हेगारांची नेहमी वर्दळ असल्यामुळे येथे अनैतिक प्रकार चालत असल्याची शंका आहे. त्यामुळे हा बार आणि बारचा मालक तपन जयस्वाल याच्या हालचालीवर पोलीस नजर ठेवणार आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी शुक्रवारी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना ही माहिती दिली.भेंडे ले-आऊट, स्वावलंबीनगर येथील रहिवासी तपन रमेशकुमार जयस्वाल एमआयडीसीत झिरो डिग्री बार चालवितो. बारमध्ये अमली पदार्थांचे तस्कर, एमडीसारखे पदार्थ मिळवण्यासाठी गुन्हेगार आणि काही आंबटशौकिन यांची नेहमी वर्दळ असते. प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेची मर्यादा न पाळता येथे पहाटेपर्यंत ग्राहकांना सेवा दिली जात असल्यामुळे बारमधून अन्य अनैतिक प्रकारचीही सौदेबाजी होत असल्याचा संशय आहे. या सर्व गैरप्रकाराची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी ९ सप्टेंबरच्या पहाटे येथे छापा घातला होता. यावेळी पोलिसांना बारमध्ये ५८ ग्राहक आढळले होते. यात चांगल्या घरच्या युवक-युवतींचीही संख्या मोठी होती. बारमधील बहुतांश ग्राहक नशेत तर्र होते. बारमध्ये पोलीस छापा घालण्यासाठी धडकल्याचे पाहून येथून काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पळून जाणारे अमली पदार्थाचे तस्कर असावे, असा पोलिसांना संशय आहे.विशेष म्हणजे, पोलिसांनी यापूर्वीही येथे दोनदा छापा टाकून कारवाई केली. मात्र, बार मालक तपन काही राजकीय पक्षाच्या स्वयंघोषित नेत्यांकडून पोलिसांवर दडपण आणून कारवाई प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. त्याचमुळे येथे एका गुन्हेगाराने फायरिंग करून आणि दोन वेळा पोलिसांनी छापा टाकून कारवाई करूनही बारमालक जयस्वाल हा बार पहाटेपर्यंत सुरू ठेवून ग्राहकांना सेवा पुरवितो. येथे तरुण तरुणींना वेगवेगळे मद्यच नव्हे तर एमडीसारखे घातक अमली पदार्थ पुरविले जात असल्याचा संशय ९ सप्टेंबरच्या छापा कारवाईनंतर गडद झाला आहे. चांगल्या घरच्या मुलामुलींना काही गुन्हेगार वाममार्गाला लावत असल्याचा संशय आहे. त्यामुळे यानंतर झिरो डिग्री बार आणि बारमालक तपन जयस्वालवर पोलीस सूक्ष्म नजर ठेवणार आहे.झिरो डिग्री बारमध्ये विशिष्ट प्रकारच्या काही कॅबिन तयार करण्यात आल्या आहेत. तेथे नेमका कोणता प्रकार चालतो, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी गुन्हे शाखा कामी लागली आहे.तपनचे कनेक्शन कुणाकुणाशी ?एमडी पावडरची तस्करी करणारी शिवानी नामक तरुणी, तिचा तस्कर मित्र, अपहरण करून हत्या करण्यात आलेली खुशी परिहार तिचे काही मित्र आणि आणखी काही जणांची ओळख, मैत्री, प्रेम प्रकरण झिरो डिग्री बारमधूनच सुरू झाल्याची खळबळजनक माहितीही पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली आहे. त्यामुळे बारमालक तपनचे कुणाकुणाशी कनेक्शन आहे, त्याचाही शोध पोलीस घेत आहेत.
तस्करांचा अड्डा बनला एमआयडीसीतील झिरो डिग्री बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:42 PM
बहुचर्चित झिरो डिग्री बारमध्ये अमली पदार्थाचे तस्कर आणि गुन्हेगारांची नेहमी वर्दळ असल्यामुळे येथे अनैतिक प्रकार चालत असल्याची शंका आहे.
ठळक मुद्देअनैतिक प्रकार चालत असल्याची चर्चा : बारमालकाच्या हालचालीवर पोलीस ठेवणार नजर