कोंढाळी: कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत वर्धा रोड टी-पाॅईंट येथे कंटेनरमधून केली जाणारी म्हशींची तस्करी पकडण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ३१ म्हशी आणि कंटेनर जप्त केला. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गुरांची कत्तलीकरिता अवैध वाहतूक होत आहे. गुरुवारी कोंढाळी येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू प्रकाश बिसेन यांना नागपूर गोरक्षणकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढाळी येथील वर्धा रोड टी-पाॅईट येथे नागपूरकडून अमरावतीकडे भरधाव वेगात जाणारा कंटेनर ट्रक क्रमांक एम.एच. ४०/ बी.एल. ६२७३ ला थांबविण्यात आले. सदर कंटेनरमध्ये नागपूर येथून अमरावतीला कत्तलीकरिता नेण्यात येणाऱ्या ३१ म्हशी किंमत ४ लाख व कंटेनरची किंमत २० लाख असा एकूण २४ लाखाचा माल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रक चालक शेख हुसेन (५०) व क्लिनर आशिष कुरेशी (२५) मु. टेका नाका नागपूर यांच्याविरुद्ध कारवाई केली. यापूर्वी मंगळवारी सांयकाळी ७ वाजता याच ठिकाणी आयशर ट्रक क्रमांक एम.एच.२०/ई.जी.९७७० मधून १५ म्हशी किंमत १ लाख ८३ हजार व चार लाखाचा आयशर ट्रक असा एकूण ५ लाख ८३ हजाराचा माल जप्त करण्यात आला होता.
कंटेनरमधून म्हशींची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:09 AM