नागपुरात टोळीचा पर्दाफाश : आसामच्या सहा बालकांची सुटकानागपूर : कचरा उचलण्यासाठी बालकांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गरिबी आणि बेकारीचा फायदा घेऊन आसाममधील मुलांची तस्करी करण्यात येत आहे. सोलापूरच्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी घेऊन जाणाऱ्या सहा आसामी अल्पवयीन मुलांची नागपुरात सुटका करण्यात आली. या घटनेमुळे मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर आसाम राज्यातील सहा मुले आढळून आली. रेल्वे स्थानकावर कार्यरत चाईल्ड लाईनच्या समन्वयक गौरी देशपांडे यांच्या ही मुले निदर्शनास आली. १२ ते १७ वयोगटात असलेल्या मुलांची त्यांनी विचारपूस केली असता, त्यांना संशय आला. या मुलासोबत असणाऱ्या एका युवकाचीही त्यांनी विचारणा केली. त्यांना काहीतरी गौडबंगाल असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी रेल्वे पोलिसांना याची सूचना देऊन, युवकासोबत सहाही मुलांना रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवले. अल्पवयीन मुलाच्या संदर्भातील कारवाईसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर पोहचून चौकशी केली असता ही मुले आसाम राज्यातील बोरापट्टा येथील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. या मुलांना सोलापूर येथील डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी नेण्यात येत होते. या मुलांसोबत असलेला मैतुल इमाम हुसैन (२५) हा युवक दलालाच्या माध्यमातून मुलांना सोलापूर येथे पोहचवित होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी बाल संरक्षण अधिनियमांतर्गत रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकास अटक केली. या सहाही मुलांना बाल कल्याण समितीपुढे सादर करून त्यांना निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)
कचरा उचलण्यासाठी बालकांची तस्करी
By admin | Published: March 17, 2016 3:25 AM