लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीवरून एमडीची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १२.०३ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवनकर नगर झोपडपट्टीजवळ गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी आरोपी शेख शहबाज शेख ईसराईल (२६, शिवनगर नगर झोपडपट्टी) हा दुचाकीने जाताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली असता त्याच्यावर एमडी पावडर आढळली. त्याने पाचपावली येथील शोबी नावाच्या पेडलरकडून एमडी घेतली होती. तो ती विक्रीसाठी घेऊन जात होता. शहबाजजवळून एमडी पावडरसह मोबाईल, दुचाकी, रोख २० हजार असा १.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नंदनवन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस ठाण्यातील पथकाच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, सिद्धार्थ पाटील, मनोज नेवारे, नितीन साळुंखे, रोहीत काळे, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर, अनुप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.