योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला. मध्यप्रदेशातून नागपुरात येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून हा माल आणण्यात येत होता. नवीन कामठी पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची नागपुरात तस्करी होते. नागपुरातून तो माल विदर्भात इतर भागात पाठविण्यात येतो. एका ट्रॅव्हल्समधून तंबाखू येणार असल्याची नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती मिळाली. त्यावरून मंगळवारी एमपी १७ पी ११४७ ही ट्रॅव्हल्स थांबविण्यात आली. तीन प्रवाशांकडे प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये साडेबारा किलो तंबाखू व साडेतीस किलो पानमसाला आढळला. त्याची किमत ३.६२ लाख इतकी होती. पोलिसांनी अजयकुमार यादव (२९, रिवा, मध्यप्रदेश), पंकज सुनिलदत्त तिवारी (२२, मऊगंज, मध्यप्रदेश) व राजेश श्रीराम विश्वकर्मा (४५, रिवा, मध्यप्रदेश) या आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला व ट्रॅव्हल्सदेखील जप्त केली