नागपूर : मध्यप्रदेशातून नागपूरसह संपूर्ण विदर्भात प्रतिबंधित तंबाखूची तस्करी सुरू आहे. शहरातील अनेक पानटपऱ्यांवर या तंबाखूची विक्री होत नाही. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनने गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पानटपरीतून १.७९ लाखांचा तंबाखू जप्त केला आह
गुरुवारी रात्री सात वाजताच्या सुमारास गुन्हेशाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून आयबीएम रोडवरील ताज पान शॉप येथे धाड टाकण्यात आली. तेथे सरकारने प्रतिबंधित केलेला १ हजार ८०० रुपयांचा तंबाखू आढळला. पोलिसांनी आरोपी फैजान शेख उर्फ शेख अमान (२४, गिट्टीखदान) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने मध्यप्रदेशातून हा तंबाखू आणल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता तेथून १.७७ लाखांचा तंबाखू आढळला. पोलिसांनी एकूण १.७९ लाखांचा तंबाखू जप्त केला. फैजानविरोधात गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, गजानन चांभारे, नरेश तुमडाम, हंसराज ठाकूर, प्रवीण शेळके, गजानन कुबडे, कमलेश गणेर, महेंद्र सडमाके, सुनिल कुवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.