नागपूर : नागपूर पोलिसांकडून गोवंश तस्करांवर नियंत्रणाचे मोठमोठे दावे करण्यात येत असले तरी सर्रासपणे तस्करी सुरू असल्याचे चित्र आहे. एकाच ट्रकमध्ये २४ गोवंश जनावरे कोंबून त्यांची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एका ट्रकमधून गोवंश जनावरांची तस्करी करण्यात येणार असल्याची टीप पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी पारडी मार्गावर एमएच ४० वाय ९०८२ या क्रमांकाचा ट्रक थांबवला. ट्रक भंडारा मार्गाकडून नागपुरकडे येत होता. आत तपासणी केली असता २४ जनावरे अक्षरश: कोंबली होती. त्यातील काही जनावरे अनेक दिवसांची उपाशी होती व त्यांना कत्तलीसाठी नेण्यात येत होते.
पोलिसांनी आरोपी सय्यद ईरशाद सय्यद अब्दुल (३४, सईदनगर, नवीन कामठी) व मिष्कात आलम उर्फ मोहम्मद महमुद (३९, सईदनगर, नवीन कामठी) यांना अटक केली. त्यांच्याकडून ट्रक, जनावरे, मोबाईल असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, आशीष कोहळे, राहुल रोठे, भिमराव बांबल, महादेव थोटे, रोनाॅल्ड ॲन्थोनी, रामनरेष यादव, राठोड, राजेंद्र टाकळीकर, अमोल भक्ते, आशीष पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अकोल्याकडे घेऊन जात होते जनावरे
आरोपींनी कामठी भाजी मंडीजवळील ईकबाल कुरेशी याच्याकडून ही जनावरे घेतली होती. ईकबाल हा जनावरांच्या अवैध खरेदीविक्री करतो. आरोपी जनावरे अकोल्याकडे घेऊन चालले होते. अकोला येथे पोहोचल्यावर ईकबाल त्यांना जनावरांच्या डिलिव्हरीचा नेमका पत्ता सांगणार होता.