नरेश डोंगरे नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीआयबी) तसेच महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) संघमित्रा एक्स्प्रेसमधून केल्या जाणाऱ्या सोन्याच्या तस्करीचा भांडाफोड केला. नागपूर रेल्वे स्थानकावर तपासणी करून रेल्वेतून ७८७.८६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे जप्त करून एकाला अटक करण्यात आली. या जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बिस्किटांची किंमत ६१ लाख ४५ हजार ३०८ रुपये असल्याचे समजते.
गाडी क्रमांक १२२९६ संघमित्रा एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयचे वरिष्ठ अधिकारी व्ही. एल. नरसिम्हा यांना दोन दिवसांपूर्वी मिळाली होती. त्याची दखल घेत त्यांनी आपल्या चमूला तसेच आरपीएफच सीआयबीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संघमित्रा एक्सप्रेसवर नजर रोखली. ठराविक वेळेनुसार, संघमित्रा एक्सप्रेस येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर येताच नरसिम्हा यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गाैरव मेश्राम तसेच आरपीएफच्या सीआयबीचे सहायक निरीक्षक राजकुमार भारती, मुकेश राठोड, अजय सिंह, जसवीर सिंह, हरविंदर सिंह आणि शाम झाडोकर यांच्या पथकाने गाडीत शिरून कसून तपासणी केली.
कोच नंबर एकच्या ३५ नंबरच्या बर्थवर बसून असलेल्या प्रवाशाचा संशय येताच त्याची चाैकशी करण्यात आली. तपासणीत त्याच्या बॅगमध्ये ७८७.८६ ग्राम सोन्याची बिस्किटे सापडली. ती कुठून आली, त्याबद्दल तोउलटसुलट माहिती देऊ लागला. आरोपी चित्तूर, आंध्र प्रदेश येथील रहिवासी असून, त्याने हे सोने कुठून आणले, तो हे सोन्याची बिस्किटे कुणाला देणार होता, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. आम्ही त्याची चाैकशी करीत आहोत, असे संबंधित सूत्र सांगत होते.