नागपूर : जीटी एक्सप्रेसमधून दुर्मिळ कासवांची तस्करी करणाऱ्या तिघांच्या नागपूररेल्वे स्थानकावर मुसक्या बांधण्यात आल्या. त्यांच्या ताब्यातून अत्यंत दुर्मिळ आणि माैल्यवान अशी ४८३ छोटी कासवं जप्त करण्यात आली. या कासवांची किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
रेल्वेच्या तपास यंत्रणेतील सीआयबी आणि डीआरआयला आज एका गुप्तचराने माहिती देऊन ट्रेन नंबर १२६१५ जीटी एक्सप्रेसमधून कासवांची तस्करी होत असल्याची माहिती दिली. ही कासवं घेऊन जाणाऱ्या तस्करांबाबत कसलीही माहिती मात्र गुप्तचराकडे नव्हती. त्यामुळे सीआयबी, डीआरआय नागपूरने आरपीएफच्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर या तपास यंत्रणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आजजीटी एक्सप्रेस नागपुरात थांबताच विविध डब्यांमध्ये कसून तपास चालविला.
कोच नंबर बी-३ मध्ये तीन जण संशयास्पद अवस्थेत दिसताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे सामान तपासण्यात आले. यावेळी त्यांच्याकडील बॅगमध्ये चक्क ४८३ छोटी कासवं आढळली. या कासवांची किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज प्राथमिक चाैकशीतून संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविला. ही कारवाई ३० सप्टेंबरपासून सुरू असली तरी आरोपींची पाळमुळं शोधली जात असल्यामुळे अद्याप सविस्तर माहिती पुढे आली नाही.
मौल्यवान मुकूट नदी कासव
जप्त करण्यात आलेल्या कासवांमध्ये अत्यंत माैल्यवान असे मुकूट नदी कासव, तपकिरी छताचे कासव आणि काळ्या तलावातील कासवांचा समावेश आहे.