गोपालकृष्ण मांडवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्पदंंश हा अपघात की नैसर्गिक घटना, असा नवा तांत्रिक पेच वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झाला आहे. सर्पदंशामुळे उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या केस पेपरवर बरेचदा एमएलसी (मेडिकल लिगल केस) असा उल्लेख होत नसल्याने वैद्यकीय सेवा मिळविताना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. काही डॉक्टरांच्या मते सर्पदंश ही घटना असते तर काहींच्या मते तो अपघात असतो. यामुळे डॉक्टरांमध्येच या विषयावरून संभ्रम दिसत आहे.नागपुरातील मनीषनगर येथील युवकाला झालेल्या सर्पदंशाच्या घटनेनंतर हा प्रकार चर्चेत आला आहे. विक्रम डांगे नामक हा युवक शताब्दी नगरात राहतो. मनीषनगर रेल्वे गेटजवळील एका दुकानात तो काम करतो. रविवारी सायंकाळी काम करताना पाय सापावर पडल्याने त्याला सर्पदंश झाला. तातडीने रुग्णालयात नेल्यावर उपचार सुरू झाले. रसेल वायफर जातीच्या सापाने दंश केल्याचे निदान झाल्यावर उपचारही सुरू झाले. केस पेपर तयार करताना त्यावर आधी एमएलसी असा शिक्का मारून नोंद घेण्यात आली. मात्र डॉक्टरांनी आपसात केलेल्या चर्चेनंतर ही नोंद खोडून काढण्यात आली. त्यावर उपस्थित सर्पमित्रासह नातेवाईकांनी आक्षेप घेतला असता सर्पदंशाची नोंद एमएलसीमध्ये होत नसल्याचे सांगण्यात आले. तर तेथीलच काही डॉक्टरांनी अशी नोंद घेण्यास हरकत नसल्याचे सांगितले. यावरून या विषयातील संभ्रम पुढे आला आला आहे.नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला या संदर्भात विचारणा केली असता, रुग्णाने सांगितलेल्या माहितीवरून डॉक्टरांनी प्रकरण समजून घ्यावे व त्यानंतर केस पेपर एमएलसी करायचे, अथवा नाही हे ठरवावे, अश्ी सुट असल्याचे सांगितले. असे असले तरी या संदर्भात स्पष्टता नसल्याने बऱ्याच प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा गोंधळ उडत असल्याचे दिसते.या संदर्भात निवृत्त निवासी वैद्यकीय अधिकारी मुनघाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्पदंशाच्या घटनेमध्ये रुग्णांच्या शरीरात विष भिनल्यावर त्याची किडनी निकामी होते. अवयवही निकामी होतात. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूही ओढवतो. मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे आवश्यक असते. त्यामुळे रुग्णाला दाखल करतानाच एमएलसी नोंद केलेली योग्य ठरते.जिल्हास्तरावरील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये सर्पदंशाच्या रुग्णांच्या केस पेपरवर एमएलसीची नोंद घेतली जाते. कारण अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफर करायचे झाल्यास ही नोंद आवश्यक ठरते.
वैद्यकीय क्षेत्र बदनाम होण्याची शक्यतासर्पदंशावर मोफत लस आणि औषधोपचार सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याचे शासनाकडून सांगितले जाते. टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या लसी सर्वत्र उपलब्ध आहेत. सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घडतात. अनेकदा रुग्णाला नागपुरातील वैद्यकीय उपचारासाठी आणले जाते. रुग्णाच्या केस पेपरवर एमएलसी उल्लेखाच्या मुद्यावरून संभ्रम असल्याने व नंतरच्या सोपस्कारात तांत्रिक अडचण येत असल्याने वैद्यकीय क्षेत्र नाहक बदनाम होण्याची शक्यता आहे. यामुळे यात स्पष्टता होण्याची गरज आहे.
सर्पदंश हा अपघात की घटना ?सर्पदंश हा अपघात की घटना या संदर्भात अनेकांचे दुमत आहे. काहींच्या मते ही दुर्घटना आहे. अचानक सापावर पाय पडल्याने तो डिवचल्या गेल्यास दंश करतो. मात्र काहींच्या मते अपघात जसा जाणीवपूर्वक होत नाही, तसाच सर्पदंशही जाणीवपूर्वक करून घेतला जात नाही. तो सुद्धा अपघातच असतो. अपघाताचे दूरागामी परिणाम शरीरावर घडतात, तसेच सर्पदंशानंतरही घडतात. त्यामुळे हा अपघात समजून एमएलसीची नोंद के स पेपरवर व्हावी, असा अनेकांचा आग्रह आहे. एखाद्याचा काटा काढण्याच्या हेतूने मुद्दाम सर्पदंश केला जात असल्यास तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कायदेशीर अधिकार आहेतच.
सर्पदंशाचे रुग्ण वनविभागाकडून वाऱ्यावरवनविभागाच्या धोरणानुसार वाघ, बिबट, अस्वल या सारख्या वन्य प्राण्यांनी माणसावर हल्ला केल्यास वैद्यकीय मदत आणि नुकसान भरपाई देण्याचे प्रावधान आहे. वन्यजीवांच्या यादीमध्ये सापांचा समावेश असला तरी सर्पदंश झालेल्या रुग्णांना वनविभागाकडून कसलीही मदत मिळत नाही. सर्पदंश झालेल्या रुग्णांच्या आाकडेवारीसाठी वनविभागाकडे संपर्क साधला असता, अशी नोंद वनविभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले.सर्पदंश विषारी असल्यास उपचार न झाल्यास रुग्ण दगावतो. कुणीही जाणीवपूर्वक दंश करवून घेत नाही. त्यामुळे त्याचे एमएलसी होणे आवश्यकच आहे. तो अपघातच मानला जावा. तांत्रिक अडचण येत असेल तर डॉक्टरांनी पोलिसांना कॉल द्यावा.- श्रीकांत उके,सर्पमित्र, नागपूर