रामटेक : शेतात मल्चिंग पेपर काढत असताना मजुराला विषारी सापाने दंश केला. दरम्यान, मजुराला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रामटेकनजीकच्या नवरगाव शिवारात मंगळवारी (दि. २९) दुपारच्या सुमारास घडली.
कृष्णा भाेंडे (२८, रा. नवरगाव, ता. रामटेक) असे जखमी मजुराचे नाव आहे. नवरगाव येथील शेतकरी गिरीश काटेकर यांच्या शेतात मल्चिंग पेपरवर मिरची लागवडीचे काम सुरू हाेते. दरम्यान शेतातील झाेपडीत ठेवलेले मल्चिंगचे बंडल काढत असताना, कृष्णाच्या हाताच्या बाेटाला विषारी नागाने दंश केला. लगेच त्याला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र राहुल खरकाटे, अजय मेहरकुळे, अक्षय घाेडाकाडे यांनी रुग्णालय गाठून कृष्णाची चाैकशी केली. साप विषारी असल्याने वेळ न दवडता कृष्णाला नागपूरला हलविण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार जखमी कृष्णाला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वन अधिकारी अगडे व वैभव उगले यांच्या उपस्थितीत विषारी सापाला पकडून जंगलात सुखरूप साेडण्यात आले.