नागपूर : सर्पदंशाच्या घटनेनंतर काही तासांतच वैद्यकीय उपचार मिळविणे योग्य असते. अन्यथा प्राणावर बेतू शकते. असे असतानाही ग्रामीण भागात आजही विष उतरविण्याचा दावा केला जातो. बुवाबाजीवर विश्वास ठेवून उपचार केले जातात. गावठी उपचारांचा प्रयत्न होतो. परिणामत: रुग्णाला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. अशा अनेक घटना आजही पुढे येत आहेत.
घटना १ :सोमवारी खवासा येथील धुरणलाल (४०) यांना दुपारी २ वाजता शेतात विषारी सापाने दंश केला. मात्र, स्थानिक बाबाकडे जाऊन झाडफूक करण्यात त्यांनी दीड तास व्यर्थ घालविला. यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकत्यार्नी धाव घेऊन रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. एंटिवेनम लावले. मात्र तोपर्यंत शरीरात विष पसरले होते. तेथून मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. मात्र सायंकाळी ६ वाजता मृत्यू झाला.
घटना २ :पारडीजवळील अडका टेमसना येथील शेतात सोमवारी सायंकाळी ६ वाजता मोरेश्वर (५५) यांना सर्पदंश झाला. काहींनी बाबाला पाचारण करून हातापायावर पट्टी बांधली. अगरबत्ती लावून उपचार सुरू केला. काही जागृत सर्पमित्रांना हे कळताच त्यांनी रात्री ९ वाजता उपचारासाठी मेडिकलला आणले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटना ३ :
मागील महिन्यात रामटेकमधील ५ वर्षीय प्रज्वल नामक मुलाला घराजवळ सापाने दंश केला. गावक?्यांनी उपचारासाठी बाबाकडे नेले. मात्र काही जागृत नागरिकांनी हस्तक्षेप करून मुलाल मेडिकलमध्ये आणले. काही दिवसांनी तो दुरुस्त झाल्यावर मुलाच्या वडलांनी बाबाकडे नेण्यासाठी हट्टाने सुट्टी करून घेतली.सर्पदंशानंतर रुग्णाला बाबाकडे नेण्याचा प्रयत्न होतो. या उपचारात वेळ वाया जात असल्याने रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी मेडिकलला नेण्याचा सर्पमित्रांकडून प्रयत्न होतो. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. यासाठी ग्रामीणांमध्ये जागृतीची गरज आहे.- नितीश भांदककर, सचिव, वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटी