लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका तिशीतील तरुणाच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याने जीवाचा धोका निर्माण झाला होता. चावा घेतलेले ठिकाण सडण्यास सुरुवात झाली होती. गँगरीन वाढून पाय कापण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेत पेशींचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला.समुद्रपूरच्या सालेरगाव येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालात काम करणाऱ्या एका तरुणाला काही दिवसांपूर्वी ‘व्हायपर’ जातीच्या विषारी सापाने चावा घेतला. त्याला गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास रुग्णाला अत्यवस्थ स्थितीत ‘ऑरेंज सिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये आणण्यात आले. रुग्णाच्या डाव्या पायावर सूज येऊन तीव्र वेदना होत होत्या. पायात गँगरीन होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ.राजेश अटल व प्लास्टीक सर्जरी तज्ज्ञ डॉ.गौरव जन्नावार यांनी युवकावर ‘अँटी व्हेनम’ औषधांपासून उपचाराची सुरुवात केली. तपासणीनंतर, रुग्णाला डाव्या पायाला विषबाधेमुळे ‘व्हस्क्युलोटॉक्सिक’चा संसर्ग झाल्याचे निदान झाले. मूत्रपिंडावरही याचा प्रभाव पडला होता. विषबाधेमुळे डाव्या पायाच्या टाचेजवळ प्रचंड वेदना आणि गँगरीन अशी गुंतागुंत निर्माण झाली. डॉक्टरांनी तातडीने ‘अॅलो -ट्रान्सप्लान्टेशन’ म्हणजे पेशीय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डॉ. जन्नावार, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ.नीता देशपांडे आणि डॉ.अनिता पांडे यांच्या चमूने तातडीने शस्त्रक्रिया केली. डॉ. जन्नावार यांनी सांगितले, पारंपरिक पद्धतीने जखमेची मलमपट्टी केल्यास, ती भरून येण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. शिवाय, पेशींचा विकासही उशिरा होतो. यामुळे रुग्णाच्या मांडीतील काही भाग ‘मायक्रोव्हस्क्युलर अॅनास्टॉमोसिस’ पद्धतीने टाचेच्याजागी प्रत्यारोपित करण्यात आला. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला. शिवाय रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली, असेही ते म्हणाले. डॉ. अटल यांनी सांगितले, विषारी सापांच्या चावण्याच्या घटना साधारणपणे, वैद्यकीय केंद्रांपासून दूर आणि बहुतांश दुर्गम ठिकाणी घडतात. यामुळे रुग्णालयात येईपर्यंत गुंतागुंत वाढलेली असते. तातडीने निर्णय व औषधोपचार करणे गरजेचे असते. या रुग्णाला आवश्यक सोयी लवकर उपलब्ध झाल्यामुळेच त्याचा जीव व पायही वाचला. नायरसन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष उदयभास्कर नायर यांनी डॉक्टरांच्या तत्परतेचे कौतुक केले. दरम्यान, रुग्णावर उपचार पूर्ण झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
सर्पदंशाने गँगरीन झालेला पाय वाचविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 1:37 AM
एका तिशीतील तरुणाच्या पायाला विषारी सापाने दंश केल्याने जीवाचा धोका निर्माण झाला होता. चावा घेतलेले ठिकाण सडण्यास सुरुवात झाली होती. गँगरीन वाढून पाय कापण्याची शक्यता होती. परंतु डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेत पेशींचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले. यामुळे तरुणाचा जीव तर वाचलाच पाय कापण्याचा धोकाही टळला.
ठळक मुद्देडॉक्टरांच्या प्रयत्नांना यश : पेशीय प्रत्यारोपणाने धोका टळला