नागपूर : सक्करदरा, भांडेप्लाॅट चाैकस्थित महावितरण कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीमध्ये १० सापांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सूचना मिळाल्यानंतर सर्पमित्रांच्या टीमने सापांच्या कुटुंबाला यशस्वीपणे रेस्क्यू केले.
महावितरण कार्यालय परिसरात ५ फूट खाेल पाण्याची टाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी टाकीला असलेल्या छिद्रातून दाेन सापांच्या मागेमागे त्यांचे पूर्ण कुटुंब या टाकीत पडले. हे साप विषारी असल्याच्या संशयावरून महावितरण कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सर्पमित्र नितीश भांदककर यांना माहिती दिली. घटनास्थळी पाेहोचल्यानंतर अनेक साप पाहून नितीश यांनी सहकारी राज चव्हाण, साहिल सरणागत, केतन देशमुख, आकाश केशेट्टीवार, कुशवंत गणाेरकर, पीयूष मेश्राम, गाैरव नागपुरे यांनाही बाेलावून घेतले. दुपारी १२.३० वाजता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. टाकीत सापांची ओळख न पडल्याने सर्पमित्रांनी सावधानपूर्वक ऑपरेशन सुरू केले. मासे पकडण्याचे जाळे टाकीत टाकून त्यात एका-एका सापाला पकडणे सुरू केले. जवळपास तासभर हे ऑपरेशन चालल्यानंतर सर्व सापांना जाळ्यातून काढण्यात आले. नितीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चिकट किल बेक नामक साप आहे. हा विषारी नसून गढूळ पाण्यात राहताे. सर्व सापांना गाेरेवाड्याच्या जंगलात साेडण्यात आले.