नागपूर : शहरात वीजपुरवठा करणाऱ्या एसएनडीएल कंपनीच्या कार्यपद्धतीची तसेच शहरातील वीजपुरवठा व्यवस्थेची आठ दिवसात तपासणी करून अहवाल देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महावितरणचे मुख्य अभियंता व अन्य अधिकाऱ्यांना दिले.रविभवन येथील सभागृहात एसएनडीएल व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. त्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या बैठकीला आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने व महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.या बैठकीत सर्व आमदारांनी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. एनएनडीएलच्या अखंडित वीज पुरवठाविषयक कामांमध्ये कोणतीही सुधारणा नसल्याचा आरोप करण्यात आला. ११ कोटींच्या विकास कामांना सुरुवात नाही. एलटी लाईनचे काम सुरू नाही. पावसाळ्यापूर्वी झाडांची कापणी केली नाही. या सर्व मुद्यांकडे ऊर्जामंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांच्या तक्रारी असून त्यांनी आपल्या कामात सुधारणा कराव्यात, असे निर्देशही एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.एसएनडीएलच्या कार्यपद्धतीवर महावितरणचे नियंत्रण नाही असे आढळले. एसएनडीएलकडून काम करून घेण्याची जबाबदारी महावितरणच्या टीमची आहे. त्यांनी कंपनीच्या कामाकडे लक्ष द्यावे. वेळोवेळी शहरातील वीजपुरवठा व्यवस्थेची तपासणी करावी, असे निर्देशही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.या तक्रारींवर एसएनडीएलने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण ते समाधानकारक नव्हते. यापूर्वीच्या बैठकांमध्ये वीजपुरवठ्याच्या कामांबद्दल एसएनडीएलतर्फे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. ऊर्जामंत्र्यांनी गठित केलेल्या समितीची बैठकही एसएनडीएलने घेतली नाही. नागपूरची वीजपुरवठा व्यवस्था चांगली राहावी म्हणून व असलेल्या त्रुटी एसएनडीएलकडून दूर करण्याची जबाबदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे महावितरणच्या मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांनी शहरातील वीजपुरवठा व्यवस्थेची तपासणी करून शहराला अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी एसएनडीएलकडून कामे करून घ्यावी, असेही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)आमदार खोपडे यांना ३४ हजाराचे वीज बिल ४या बैठकीत जास्त वीज बिलाच्या तक्रारी करण्यात आल्या. आमदार खोपडे यांचे वीज बिल ३४ हजार रुपये आल्याचे यावेळी सांगण्यात आले. लहानशा वादळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक घडतात. तसेच केबलसाठी खोदण्यात आलेले खड्डे अजूनही बुजवण्यात आले नाही, याकडेही बैठकीत लक्ष वेधले गेले.
‘एसएनडीएल’ला ब्रेकडाऊनचा शॉक!
By admin | Published: June 28, 2016 2:29 AM