रात्री उशिरा निघाला तोडगा नागपूर : कोट्यवधीच्या थकबाकीमुळे अडचणीत सापडलेल्या शहरातील वीज वितरण फे्रन्चायजी स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडवरील (एसएनडीएल) संकट पुन्हा एकदा टळले आहे. सोमवारी एसएनडीएलचा परवाना रद्द होणार आणि महावितरण रात्री १२ वाजतापासून पुन्हा शहरातील वीज वितरणाचा ताबा घेणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्या दिशेने हालचालीसुद्धा सुरू झाल्या होत्या. महावितरण प्रशासनाने कंबर कसली होती. माहिती सूत्रानुसार एसएनडीएलकडे महावितरणची १०१ कोटींची थकबाकी आहे. शिवाय सध्या जमा असलेली ७४ कोटींची बँक गॅरंटी वाढवून देण्याची वारंवार मागणी केली जात आहे. परंतु एसएनडीएलने त्याकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे महावितरणने मागील डिसेंबर महिन्यात एसएनडीएलला थकबाकीची नोटीस बजावली होती. त्या नोटीसची ३१ जानेवारी रोजी मुदत संपली. मात्र एसएनडीएलने कोणतीही थकबाकी जमा केली नाही. त्यावर महावितरणने मागील सात दिवसांपूर्वी एसएनडीएलला थेट ‘टर्मिनेशन’ नोटीस बजावली. त्या नोटीसीची सोमवारी मुदत संपल्याने या सर्व हालचालींना वेग आला होता. माहिती सूत्रानुसार सोमवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई येथे महावितरण आणि एसएनडीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकी चालल्या. शेवटी एसएनडीएलच्या काही आश्वासनांसह ‘टर्मिनेशन नोटीस’ वर तोडगा निघाला, आणि एसएनडीएलवरील संकट काही दिवसांसाठी टळले.(प्रतिनिधी)
एसएनडीएलवरील संकट टळले! १०१ कोटींची थकबाकी :
By admin | Published: February 09, 2016 3:09 AM