लाकडी बल्ल्यांवरून होतो वीज पुरवठा : एसएनडीएलची पोलखोलनागपूर : वीज वितरण फ्रेन्चायजी स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेड वीज ग्राहकांना तत्पर व उत्तम सेवा पुरविण्याचा धिंडोरा पिटत असताना, नारा परिसरातील लाकडी बल्ल्यावरून होत असलेल्या वीज पुरवठय़ाने कंपनीच्या दाव्याचा भंडाफोड केला आहे.येथील हजारो नागरिक लाकडी बल्ल्यांवर लटकत असलेल्या जिवंत तारांखाली जीव मुठीत घेऊ न जगत आहे. मात्र अजूनपर्यंतही एसएनडीएलचे त्याकडे लक्ष पोहोचलेले नाही. एसएनडीएलने या परिसरातील ओमनगर येथे सुमारे २00 पेक्षा अधिक लोकांना अधिकृत वीजपुरवठा दिला आहे. परंतु त्यासाठी कुठेही पोल उभारण्यात आलेले नाहीत. चक्क लाकडी बल्ल्या व लोखंडी अँगल उभे करून वीजपुरवठा दिला जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात जिवंत वीज तारांचे जाळे पसरले आहे. सध्या रोज सुरू असलेल्या वादळात त्या लाकडी बल्ल्या जिवंत तारांसह कधीही कुणाच्या अंगावर पडून मोठा अपघात घडू शकतो. परंतु एसएनडीएलला त्याची कुठेही चिंता दिसून येत नाही.
येथील वीज ग्राहक गत पाच वर्षांपासून वीज पोलसाठी ओरड करीत आहे. त्यासाठी येथील नागरिक अगोदर स्पॅन्कोकडे व आता एसएनडीएलकडे वारंवार मागणी करीत आहे. मात्र त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. वादळामुळे येथील अनेक लाकडी बल्ल्या खाली वाकल्या आहेत. त्यासोबत त्यावरील जिवंत ताराही खाली आल्या आहेत. 'लोकमत' प्रतिनिधीने मंगळवारी येथे प्रत्यक्ष भेट घेऊ न परिस्थितीचा आढावा घेतला असता, एसएनडीएलची पोलखोल पुढे आली. यावेळी परिसरातील नागरिक नंदकिशोर धर्मेजवार, किशोर दुधे, संजय सर्मथ व महेश श्रीवास्तव यांच्यासह अनेकांनी एसएनडीएलविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला.(प्रतिनिधी)