नागपूर : स्लिपरच्या तुलनेत एसी कोचचे प्रवास भाडे फार जास्त नाही. प्रवाशांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे स्लिपर कोच कमी करून रेल्वे गाड्यांत थर्ड एसी कोच वाढविले जात आहेत, असा अजब युक्तिवाद मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी शुक्रवारी नागपुरात केला. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही यासंबंधाने नापसंती व्यक्त केली आहे.
महाव्यवस्थापक यादव यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यात पत्रकारांनी स्लिपर कोचची संख्या कमी करून एसी कोच वाढविल्या जात असल्याने प्रवाशांची आर्थिक कोंडी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्यामुळे एसी कोच वाढविल्याचे सांगितले. मात्र, स्लिपर कमी झाल्यामुळे अनेक गाड्या रिकाम्या (तोट्यात) धावत असल्याचे आणि पुन्हा एसी कोच बंद करून स्लिपर वाढविल्याने याच गाड्या भरभरून धावत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर यादव यांनी स्लिपर आणि थर्ड एसीमधील प्रवास भाड्याच्या रकमेत फारसा फरक नसल्याचे म्हणाले. या संबंधाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी त्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली. गरिबांसाठी १० रुपये, २० रुपये जास्त असतात, हे रेल्वे प्रशासनाने समजून घ्यायला पाहिजे. स्लिपर आणि एसी कोचमधील भाड्याचा फरक इतरांसाठी फारसा जास्त वाटणारा नसेल मात्र गरिबांसाठी तो खूप जास्त असल्याचेही अनेकांनी म्हटले आणि रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार समाजाच्या प्रत्येक स्तरातील प्रवाशांचा विचार केला जावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.ज्यांना एसी सूट होत नसेल त्यांचे काय?
अनेक प्रवाशांना एसीची अॅलर्जी असते. असे प्रवासी जनरलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांचे काय, असा सवाल भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी व्यक्त केला. गरीब व्यक्ती दिवसभर राबतो तेव्हा पाच-पन्नास रुपये त्याच्या हातात पडतात. अशात त्याच्या हक्काचा डबा बंद करून जास्त फरक नाही म्हणून थर्ड एसीचे तिकीट काढण्यास बाध्य करणे, योग्य नाही, असेही शुक्ला यांनी म्हटले आहे.