उमरेड : यंदाच्या खरीप हंगामात उमरेड विभागात असंख्य शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्र पद्धतीने सोयाबीनची पेरणी तसेच सरी वरंभावर टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली. शेतकऱ्यांच्या या अभिनव प्रयोगाकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास कृषी क्षेत्रातील हे क्रांतिकारक पाऊल ठरेल, असा आशावाद विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी व्यक्त केल्या. भोसले यांनी उमरेड परिसरात पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नवेगाव साधू येथील प्रगतिशील शेतकरी संजय वाघमारे यांच्या शेतशिवारात सहा एकरातील टोकन पद्धतीने सोयाबीनच्या लागवडीची त्यांनी पाहणी केली. सोबतच रवींद्र वाघमारे यांच्या शेतातील पिकांबाबतही माहिती घेतली. यावेळी यावेळी विभागीय कृषी अधीक्षक प्रज्ञा गोळघाटे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, कृषी पर्यवेक्षक एस. यु. मेश्राम, कृषी सहायक अरुण हारोंडे आदींची उपस्थिती होती.
बीबीएफ तंत्र पद्धती तसेच टोकन पद्धतीने सोयाबीनच्या लागवडीमध्ये बियाणांची बचत होते. झाडांची योग्य वाढ होते. शेतकऱ्यांना टोकन मशीन उपलब्ध झाल्यास निश्चितच अधिकांश शेतकरी याकडे वळतील, असाही विश्वास भोसले यांनी व्यक्त केला. अधिकांश प्रमाणात बीबीएफ यंत्र उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या हंगामात अधिकांश शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेकडे बारकाईने लक्ष दिले असून ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचेही ते बोलले. इतर शेतकऱ्यांना हा प्रयोग दाखवा, असेही ते म्हणाले. यावेळी संजय वाघमारे, रवींद्र वाघमारे, सुनील पाटील, दिनेश झाडे, सतीश चकोले, किशोर नांदूरकर, नीलकंठ वाघमारे, राजेराम राऊत, प्रशांत कारगावकर आदींची उपस्थिती होती.
---
उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू शिवारातील टोकन पद्धतीने सोयाबीनच्या लागवडीची पाहणी करताना विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले.