लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्व नागपुरातील नागरिकांना मोठी स्वप्ने दाखविली जात आहे. परंतु पावसाळा सुरू होण्याला दोन आठवडे होत नाही तोच या परिसतील परिस्थिती गंभीर झाली आहे. देखभाल नसल्याने जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यांना खड्ड्याचे स्वरुप आले आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरम नगर ते भरतवाडाकडे जाणाऱ्या मार्गावरील नौकन्या नगर परिसरातील रस्ता हरपला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने बाईक तर दूरच पाण्याचे टँकर, ट्रक मोठ्या शिताफीने चालवावे लागत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी अपघाताचा धोका आहे. तसेच लक्ष्मीनगर, विजय नगर, गुलमोहर नगर, ओम नगर यासह आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था अशीच बिकट आहे. परिसरात पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने जागोजागी पाणी साचत आहे.
कळमना ते भरतवाडा दरम्यानचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा केला जात आहे. परंतु काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोेरे जावे लागत आहे.
गुलमोहर नगर, नसेमन सोसायटी येथे मोठमोठी घरे उभारण्यात आली. परंतु अजूनही पक्के रस्ते नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे शक्य होत नाही. या परिसरात राहणारे पवन शाहू म्हणाले, रस्त्यांची डागडुजी नागरिकांना स्वत: पैसे खर्च करून करावी लागत आहे. नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. नौकन्या नगर परिसरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली. भोलानाथ तिवारी म्हणाले, स्मार्ट सिटीच्या विकासाला आमचा विरोध नाही. परंतु चांगली घरे तुटताना बघवत नाही. परिसरातील समस्या मार्गी लागणे गरजेचे आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांर्गत ५२ कि.मी. पैकी १२ कि.मी. रस्त्यांचे काम सुरू करणे शक्य झाले आहे. त्यात प्रमुख मार्गाचा समावेश आहे. अंतर्गत मार्गाकडे मनपाचे लक्ष नाही. या परिसरातील ले-आऊट गुंठेवारीत येतात. तर ले-आऊट अजूनही मंजूर नाही. यामुळे या परिसरात सुविधांचा अभाव आहे.
विशेष म्हणजे पूर्व नागपुरातील प्रभाग ४ मधून मागील दोन वर्षापासून लकडगंज झोन सभापती आहे. इतकेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्ष या परिसरातील होते. परंतु परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करता आलेली नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेल्या भागात प्रामुख्याने भाजपचे नगरसेवक आहेत. परंतु समस्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे.
....
घर तोडून रस्ता करण्याला विरोध
स्मार्ट सिटी प्रकल्पात रस्ता रुंदीकरणासाठी अनेकांची घरे तोडली आहे. परंतु अनेकांना अजूनही मोबदला मिळालेला नाही. दुसरीकडे कळमना ते जयगंगा मॉ सोसायटी मार्गे पारडी पर्यंत रस्त्याचे काम केले जाणार आहे. यासाठी २५० लोकांची घरे तोडली जाणार आहे. काही महिन्यापासून प्रकरण प्रलंबित आहे. प्रकरण आर्बिटेशन मध्ये गेले. परंतु यावर तोडगा निघाला नाही. येथील रस्त्याचा प्रकल्प वगळण्यात यावा. अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु काही नेत्यांची येथील जमिनीवर नजर आहे. त्यामुळे हा अट्टाहास सुरू आहे. रस्ता वस्तीतून जात असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे.