... म्हणून सुट-बुट घालून अधिवेशनाला आलो, अजित दादांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 03:50 PM2019-12-17T15:50:43+5:302019-12-17T15:51:26+5:30
आपल्या नेहमीच्या पेहरावात न येता, नागपूर विधिमंडळात अजित पवार यांची एंट्री जोधपुरी
नागपूर - हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. त्यामुळे संसदीय कामकाजासाठी नव्याने आलेल्या आमदारांनी पहिल्यांदाच विधानसभेत येत असल्याचा आनंद व्यक्त केला. हिवाळी अधिवेशन असल्याने नागपूरात चांगलीच थंडी पडली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला. तर, पहिल्याचदिवशी सावराकरांवरील विधानावरुन सरकारला लक्ष्य केलं. यंदाच्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एंट्री लक्षणीय ठरली.
आपल्या नेहमीच्या पेहरावात न येता, नागपूर विधिमंडळात अजित पवार यांची एंट्री जोधपुरी सुट-बुट परिधान करुन झाली. अजित पवारांचा हा लूक पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, तशी चर्चाही अधिवनेशाच्या ठिकाणी सुरू झाली. याबाबत अजित पवारांना विचारलं असता, त्यांनीच आपल्या पोशाखावर स्पष्टीकरण दिलं. ''सध्या मोठा गारठा सुटलाय, जरा व्यवस्थित राहावं म्हणून जाड कपडे घातले,'' असं अजित पवार यांनी सांगितलं. यापूर्वी आपल्या एका भाषणात अजित पवारांनी सुटा-बुटात येणाऱ्या सहकारी आमदाराला टोला लगावला होता. तसेच, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना सुट-बुट घालत होतो, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर, बऱ्याच दिवसांनी अजित पवारांचा हा जोधपुरी ड्रेस परिधान केलेला लूक कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. राज्य सरकारला नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत असलेल्या अधिकारांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नागपूर दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंची चर्चा होणार आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेसुद्धा नागपुरातच आहेत. त्यामुळे बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सकाळी विधान भवन परिसरात आयोजित बैठकीत सांगितले.