नागपूर : भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला असून यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे आमच्याकडे काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्यांनी वाक्य उलटं म्हटलं. कारण तेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे चालवत होते, असा पलटवार बावनकुळे यांनी केला.
ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ महाराष्ट्र (आफ्रोह) या संघटनेतर्फे संविधान चौकात जात प्रमामणपत्र पडताळणी समिती विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या विरोधात उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
२०१४ वा २०१९ मध्ये भाजपविरोधात जे काही कट कारस्थान झाले, त्याला शिवसेना पक्षप्रमुखांचे संरक्षण होते. कारण प्रमुख व्यक्तीचे समर्थन असल्याशिवाय काहीच होत नाही. उद्धव ठाकरेंनीच तो कट केला असेल, म्हणून अस झालं असावं, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे ५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास निघाले होते. असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडींकडे लक्ष घातले असता लक्षात येते की, याच काळात चंद्रकांत खैरे ॲक्टीव झाले आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे, असे म्हणत त्यांनी खैरेंवर टीका केली.
काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही अस अशोक चव्हाणांनी म्हटलं.