लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा आदिवासी समाज संघटनांनी एकत्रित येऊन विरोध दर्शविला. ते नाव बदलून ‘गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान’ असे नाव ठेवावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू आणि रास्ता रोको करू, असा इशारा आदिवासी समाज संघटनांनी शनिवारी दिला.
रॅायल गोंडवाना आदिवासी विकास युवा संघ, आदिवासी विकास परिषद, ॲार्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल, ऑल इंडिया एम्प्लॅाईज फेडरेशन, गोंडवाना गणतंत्र पार्टी, ऑफिसर फोरम या संघटनांसह अनेक आदिवासी बांधवांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना रविभवनात भेटून निवेदन दिले. यानंतर आमदार विकास ठाकरे यांना घेराव घातला. ठाकरे यांच्यासह आदिवासी संघटनांनी एफडीसीएमचे कार्यालय गाठले. तेथे विभागीय संचालक वासुदेवन यांनाही निवेदन देण्यात आले. आ. ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना फोन करून आदिवासींच्या भावना कळविल्यानंतर आंदोलक शांत झाले.
नागपूरची स्थापना ३५० वर्षापूर्वी राजे बक्त बुलंद शहा यांनी केली. विदर्भातील सर्व जिल्हे गोंडवाना म्हणून ओळखले जातात. या भागाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असून संस्कृती आहे. आदिवासींची अस्मिता या मातीशी जुळली आहे. गोरेवाडा तलावाची निर्मिती गोंडवानातील महाराजांच्या काळातील आहे. ती आठवण कायम राहण्यासाठी गोंडवाना या नावाने आंतरराष्ट्रीय उद्यान उभारा, अशी मागणी संघटनांनी केली. आम्हाला बाळासाहेबांबद्दल आदर आहे, मात्र त्यांचे नाव येथे नको, इतरत्र द्या, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी महापौर मायाताई इवनाते, आकाश मडावी, दिनेश शेराम, राजेंद्र मरसकोल्हे, मधुकर उईके, राजेश इरपाते, एन.झेड. कुमरे आदी उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
जनभावना लक्षात घेऊन नाव बदल न केल्यास आणि गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे नाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. २६ जानेवारीला काटोल टोल नाका रोडवर रास्ता रोको करण्याचा तसेच विमानतळावर आणि गोरेवाडा प्रवेशद्वारासमोर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
...
कोट
बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी असा निर्णय घेतला नसता. उलट स्वत:हून नाव दिले असते. ते आदिवासींच्या बाजूचे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनभावना लक्षात घेऊन गोंडवाना असे नामकरण करावे, ते समजून घेतील अशी अपेक्षा आहे. आम्ही त्यांचे स्वागतच करू, मात्र तसे न झाल्यास तीव्र विरोध करू.
- मायाताई इनवते, संयोजक
...