कमलेश वानखेडेनागपूर : विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव सेनेने दावा केला तर काँग्रेसतर्फे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार आहे. तशा हालचाली काँग्रेस नेत्यांनी सुरू केल्या असून या संबंधिचा तोंडी प्रस्तावही उद्धव सेनेकडे देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. विजय वडेट्टीवार यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा उद्धव सेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे सोपविली होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदावर स्वतंत्रपणे दावा करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास त्यावर पहिला दावा उद्धव सेनेकडून केले जाणार आहे. उद्धव सेनेने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्यास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. विधान परिषदेत उद्धव सेनेचे सात व काँग्रेसचे सात सदस्य आहेत. शरद पवार गटाचे पाच सदस्य आहेत. काँग्रेस व उद्धव सेनेचे संख्याबळ समान असल्यामुळे काँग्रेसने परिषदेवर आपला दावा सादर केला आहे. विरोधी पक्षनेते पद हे संविधानिक अधिकार मिळवून देणारे पद आहे. हे पद ज्या पक्षाला मिळते अप्रत्यक्षपणे त्या पक्षालाही बळ मिळते. त्यामुळेच काँग्रेस विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात एकट्या उद्धव सेनेला विरोधी पक्षनेतेपद सोपविण्यास तयार नाही. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनात यावर योग्य निर्णय होईल.