उमरेड : मंगळवारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी धडकी भरवत पाऊसधारा बरसल्या. कालचा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असून अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगाच पेरणीसाठी घाई करू नये. ‘पेरणीची घाई, मोड होण्यास निमंत्रण देई’असे तालुका कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सोयाबीन पिकासाठी जोपर्यंत ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत तरी कोणत्याही प्रकारे पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करणे योग्य नाही. सध्या जमिनीमध्ये उष्णता भरपूर आहे. पुरेसा ओलावा नाही. अशावेळी पेरणी केल्यास उगवण शक्तीवरसुद्धा परिणाम होतो. अंकुरण्याच्या क्षमतेतसुद्धा घट होते. बियाणे जमिनीमध्ये खराब होऊन सडते. अशावेळी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवू शकते,असे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले. आधीच बियाणांच्या उपलब्धतेबाबत शेतकरी समाधानी नाहीत. अशावेळी दुबार पेरणी जर झाली तर बिकट समस्या समोर येऊ शकते.
असा झाला पाऊस
उमरेड शहरात मंगळवारी ५०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत शहरातील एकूण पाऊस ५३.७ मिलिमीटर आहे. मकरधोकडा येथे ९.२ मिलिमीटर, पाचगाव (४.६), हेवती (८.४), बेला येथे ३.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात सरासरी एकूण २१.७२ मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्यात झालेला पाऊस पेरणीयोग्य नाही. यामुळे पेरणी करणे योग्य होणार नसल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.