लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाच्या जवानांनी शुक्रवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या १४ नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यांत शोध पथकांनी ३८,०६८ नागरिकांविरुद्ध कारवाई करून आतापर्यंत १ कोटी ७३ लाख ९३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अद्यापही टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरताना दिसतात. ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे, तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे. शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाद्वारे धरमपेठ झोनअंतर्गत ६, धंतोली झोनअंतर्गत १, गांधीबाग झोनअंतर्गत ३, सतरंजीपुरा झोनअंतर्गत २ आणि आशीनगर झोनअंतर्गत २ जणांविरुद्ध ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.