अवकाळी पावसाने पोल खोलली : मनपा प्रशासन कधी होणार जागे?नागपूर : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. पण पावसाळा सुरू झाला की, येथील नागरिकांचे हाल होतात. विकासासोबतच या शहरातील नागरिकांच्या वाट्याला असुविधाही आल्या आहेत. असेच हाल आता उपराजधानीतील नागरिकांचे होण्याची चिन्हे आहेत. शहराच्या विकासासोबतच नागरी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. राज्य सरकार व महापालिकेने याची वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील. याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसातील अवकाळी पावसामुळे आला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नागपूर शहराचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबणे, गटारी तुंबणे, रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यावर वाटेल तेथे होणारे खोदकाम यामुळे खरंच नागपूर ‘स्मार्ट सिटी’ होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने हे स्थानिक प्रश्न अतिशय गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे.दरवर्षीच्याा पावसाळ्यात जोराचा पाऊ स झाला की शहरात चौकाचौकात पाणी साचते. डांबरीकरण वाहून रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. अनेक वस्त्यात दोन-तीन फूट पाणी तुंबते, ठिकठिकाणी घरात पाणी शिरल्याने लोकांची ताराबंळ उडते. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही नाईलाज असतो. मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता मनपा प्रशासन पुढील वर्षात उपाययोजना करेल, अशी अपेक्षा असते. संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व नियोजन केल्याचा प्रशासनाकडून दावा केला जातो. परंतु जोराचा पाऊ स आला की नियोजन कुठे गेले, असा प्रश्न शहरातील नागरिक ांना पडतो. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होईल, अशी ६६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरवर्षी याच वस्त्यांत समस्या निर्माण होते. असे असतानाही यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाही, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. असेच चित्र कायम राहिले तर स्मार्ट सिटी हे एक दिवास्वप्नच ठरणार आहे. पावसाळ्यात पाणी न साचणाऱ्या शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर पाणी साचले. अनेक वस्त्यांतही हीच परिस्थिती होती. शहरातील सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात केबल लाईन, पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. परंतु खोदकामाची माती वा मुरुम पावसाळी नाल्या व सिवरलाईनमध्ये शिरल्यानंतर त्या तातडीने साफ केल्या जात नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. हीच बाब मनपातील पदाधिकारी व अधिकारी यांच्या निदर्शनास का येत नाही? प्रशासन व पदाधिकारी यातून कधी धडा घेणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ड्रेनेज लाईनची सफाई नाही४पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनच्या सफाईवर दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु पाऊ स आला की त्या तुंबतात. सीताबर्डी, महाल, सदर, मानेवाडा रोड, सक्करदरा, नरेंद्रनगर, हुडकेश्वर, बेसा, नंदनवन, शिवाजीनगर, मानकापूर, पुनापूर, इमामवाडा, जुनी शुक्रवारी, कुंभारटोली, शास्त्रीनगर, संजयनगर, पंचशीलनगर, नारा, ओमनगर, चुनाभट्टी, सुभाष रोड, मोमीनपुरा, ताजबाग आदी भागात फेरफटका मारला असता पावसाळी नाल्यांची सफाई होत नाही. तुंबल्यानंतर तक्रार आली तरच मनपाचे कर्मचारी येतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.पाणी शिरण्याच्या घटनांत वाढमागील सात वर्षांत घरात वा वस्त्यांत पाणी शिरण्याच्या घटनांचा विचार करता यात दरवर्षी वाढ होत आहे. २००८ साली जेमतेम २१ घटना घडल्या, तर २०१४ या वर्षात तब्बल २४० घटना घडल्या होत्या. पाणी शिरण्याच्या घटना ठराविक वस्त्यांत होतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी योजना राबविण्याची गरज आहे. परंतु दरवर्षी पावसाळ्यात तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. यावर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. पावसाळा संपला की मनपा प्रशासनालाही या वस्त्यांचा विसर पडतो. यावरील खर्च पाण्यात जातो.मान्सूनपूर्व कामांना सुरुवात नाही शहरात वाहणारे प्रमुख सात नाले आहेत. यात हुडकेश्वर नाला, स्वावलंबीनगर नाला, शंकरनगर नाला, शांतिनगर, चांभारनाला व हत्तीनाल्याचा समावेश आहे. नाल्यांच्या सफाईकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पाऊस झाला की ठिकठिकाणी पाणी तुंबून ते नाल्याकाठावरील वस्त्यांत शिरते. नाग नदी व पिवळी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. नदीपत्रातील कचरा काढण्यात आला. त्यानंतर नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष होत आहे. नाग नदीच्या स्वच्छतेचे तीनतेरानाग नदी व पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. नदीपात्रातील गाळ काढल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पात्र स्वच्छ दिसत होते. अनिल सोले यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपला आणि प्रशासनाने नदी स्वच्छतेकडे पाठ फिरवली. सध्या नाग व पिवळी नदीच्या पात्रात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. मोरभवन बसस्थानकाजवळ नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी साचते. यामुळे नाग नदी स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले आहे.
- तर कशी होईल ‘स्मार्ट सिटी’?
By admin | Published: April 16, 2015 2:00 AM