अरुण महाजन
खापरखेडा : ग्रामविकासातच देशाचा विकास असं म्हटलं जातं. मात्र, ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी पूर्णवेळ ग्रामसेवकच नसतील तर, कसा चालेल गावांचा कारभार हा प्रश्न उपस्थित होतोच.
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा मतदार संघ असलेल्या सावनेर तालुक्यात ७५ ग्रामपंचायती आहेत. मात्र, तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींना पूर्णवेळ ग्रामसेवक नाही. ४० ग्रामसेवकांच्या भरवशावर तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीचा कारभार सुरु आहे. काही ग्रामसेवकांवर दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त प्रभार असल्याने ना इकडचे ना तिकडचे अशी त्यांची अवस्था झाली आहे. इकडे ग्रामसेवक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबतात अशा तालुक्यातील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
खापरखेडा परिसरात पाच किलोमीटर परिसरात भानेगाव, चिचोली आणि पोटा अशा तीन मोठ्या ग्रामपंचायती आहेत. भानेगाव येथे गजानन शेंबेकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असून यांच्याकडे खैरी (ढालगाव) आणि पंढरी (ज) या ग्रामपंचायतचाही कार्यभार आहे. तिन्ही ग्रामपंचायतीचे अंतर लांब आहे. यामुळे या ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ द्यावा लागतो. असाच प्रकार पोटा ग्रामपंचायतचा आहे. येथे रवींद्र हुसे हे ग्रामसेवक कार्यरत असून त्यांच्याकडे मानेगाव (पंध) आणि पिपळा (डाकबंगला) या ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. चिंचोलीचे ग्रामसेवक व्ही.आर. लंगडे यांच्याकडे इथला स्वतंत्र कारभार आहे. दहेगाव रंगारी हे गाव सुद्धा मोठे आहे. येथे पद्माकर बाळापुरे हे ग्रामसेवक कार्यरत असून यांच्याकडेही स्वतंत्र कारभार आहे. तालुक्यातील काही ग्रामसेवकांना केवळ एकाच ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना काही ग्रामसेवकांवर दोन-तीन ग्रामपंचायतीची जबाबदारी का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. पोटा आणि भानेगाव या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक वेळोवेळी हजर राहत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी त्रस्त आहेत. लगतच्या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले स्थायी ग्रामसेवक यांना पोटा ग्रामपंचायत येथील अतिरिक्त कारभार दिल्यास ग्रामसेवकास संपर्क साधण्यास दिरंगाई होणार नाही. चिंचोली आणि पोटा या दोन्ही ग्रामपंचायत कार्यालयाचे अंतर केवळ २ किलोमीटर एवढे आहे. रवींद्र हुसे यांचा पोटा ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार काढून त्यांच्या जागेवर व्ही.आर.लंगडे हे चिंचोली ग्रामपंचायतीचे सचिव देण्यात यावे अशी मागणी आधार शक्ती महिला मंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पोटा येथे स्थायी ग्रामसेवक नियुक्त करून त्यांच्याकडे भानेगाव ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार द्यावा. पोटा आणि भानेगाव या
ग्रामपंचायत कार्यालयाचे अंतर केवळ ३ किलोमीटर आहे, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे. यासंदर्भात सावनेर तालुक्याचे खंड विकास अधिकारी अनिल नागाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामसेवकांच्या नियुक्त्या प्रशासकीय कामाचा भाग असल्याचे सांगितले. यासोबतच ग्रामपंचायतीचे कोणते काम होत नाही, अशी विचारणा करीत अधिक बोलण्यास टाळले.