नागपूर : आमदार रवी राणा यांना आरोपांचे पुरावे सादर करण्यासाठी १ नोव्हेंबरची मुदत दिल्यानंतर भाजप नेत्यांचे समन्वयासाठी फोन आले. मात्र, त्यानंतर पुन्हा राणा यांनी ट्विट करून उचकवण्याचा प्रयत्न केला. आता ही आरपारची लढाई आहे. माझं राजकारण चुलीत गेलं तरी चालेल. यात गेम झाला तर मी आमदाराकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरेन, असा इशारा पुन्हा एकदा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिला.
फुसका बार आहे की बाॅम्ब हे दाखवू...
आमदार कडू म्हणाले, माझा फुसका बार आहे की बाॅम्ब आहे, हे तारखेला दाखवू. कसा कुणाच्या खाली बॉम्ब लावायचा हे बच्चू कडूला चांगलं माहीत आहे. १ तारखेला ट्रेलर दाखवू. १५ दिवसात पिक्चर पूर्ण करू. शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कायदेशीर नोटीस पाठविणार व या नोटीसमध्ये त्यांना विचारणार की मला पैसे कुणी दिले. रवी राणा यांच्या आरोपाची ईडी चौकशी व्हावी. मी चौकशीला तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. पुढील अडीच वर्षांत १० आमदार निवडून आणणार. पुढचं सरकार आमचं असेल, असा दावाही त्यांनी केला.