नागपूर/मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या विधिमंडळात चर्चेला आला आहे. एकीकडे विधानसभा आणि विधानपरिषदेतही मराठा आरक्षणावर चर्चा होत आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात पुढील आंदोलनाची दिशा ठरत आहे. विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका सर्वपक्षीय आमदारांनी घेतली असून सभागृहात ती मांडण्यातही आली. तर, ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, अद्यापही आरक्षणाचा मुद्दा कसा सुटणार हाच खरा प्रश्न आहे. आता, याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसेच, मनोज जरांगेंच्या आंदोलनात स्वत: सहभागी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेली मुदत आता संपत आहे. २५ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिला होता. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारने दिलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. आमदार बच्चू कडू यांच्याकडे ते पत्र आहे, ज्यात सरकारने आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिलं होतं, असे जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता आमदार बच्चू कडू यांनीही जरांगे पाटील यांना आपण शब्द दिला होता, हे सांगत त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे.
सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे, सरकारने आत्तापर्यंत काय केलं याचा अहवालही अद्याप दिलेला नाही. सरकारने काम चांगलं केलं असलं तरी त्याची लेखी स्वरुपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष मराठा समाजामध्ये असणार आहे. शिंदे समितीने काय केलं, किती मराठा समाजाला दाखले दिले, याचा अहवाल राज्य सरकारने आजपर्यंत दिला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
गुन्हे मागे घेण्यासंदर्भात, जे जे गुन्हे तात्काळ मागे घेता येऊ शकत होते, त्याही बाबतीत सरकारने पाऊले उचलले नाहीत. आज संध्याकाळपर्यंत पाऊलं उचलली पाहिजेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले. तसेच, मी ज्यावेळी जरांगे पाटलांना भेट द्यायला गेलो होतो, त्यावेळी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे, त्यांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे, त्यांचं उपोषण सुटलं पाहिजे असे मला वाटलं. त्यावेळी, ती भूमिका आम्ही निभावली, काही शब्द आमच्याकडून देण्यात आले आहेत. आता, ते शब्द पाळण्याची वेळ कदाचित आमच्यावर येऊ शकते. म्हणून, सरकारने जे शब्द आणि वेळ दिली होती ते पाळले पाहिजे. जर सरकारने हा शब्द पाळला नाही. तर, शब्दाचा धनी म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील
१७ डिसेंबरच्या बैठकीत आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सरकारने आम्हाला जे लिहून दिलं होतं, त्यानुसार १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होतं. मात्र, अद्याप तसं काहीही आम्हाला मिळालेलं नाही. सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं, त्याचे व्हिडिओही आहेत. जर १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, त्याबाबतचा आदेश मिळाला नाही. तर, तुमचा-आमचा विषय संपला. त्या दिवशीच्या बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच, मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.