राजीव सिंह
नागपूर : तीन दिवस पडलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याचा पावसाचा बॅकलाॅग दूर केला असेल, पण ज्या जलाशयातून नागपूर शहराला पाणीपुरवठा केला जाताे, तेथील जलसाठ्याची स्थिती अजूनही हवी तेवढी नाही. अपेक्षित पाऊस न पडल्याने पेंच नदीवरील ताेतलाडाेह व कामठी खैरी धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही.
सध्या या दाेन्ही जलाशयात अनुक्रमे ६४.२५ व ४८.९४ टक्के जलसाठा भरलेला आहे. गेल्यावर्षी याच काळात ९५.६३ आणि ९३.८० टक्के पाणीसाठा भरला हाेता. यावरून येत्या काळात पावसाची कृपा झाली नाही, तर उन्हाळ्यामध्ये नागपूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पेंच नदीवरील ताेतलाडाेह आणि कामठी खैरी धरणाच्या कॅचमेंट एरियात पाऊस पडला तर येथील जलसाठा वाढताे. विशेष म्हणजे दाेन्ही धरणांतील जलसाठा मध्य प्रदेशात हाेणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. कारण याच नदीवर छिंदवाडाजवळ चाैराई धरण बनले आहे. या धरणातील जलस्तर वाढल्यानंतरच पाणी साेडले जाते व पुढे ताेतलाडाेह आणि कामठी खैरीपर्यंत पाेहोचते. मात्र यावर्षी चाैराई धरणही केवळ ५३.४५ टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता ४२१.२० द.ल.घ.मी. आहे आणि सध्या तेथे २२५.११ द.ल.घ.मी. पाणी साठलेले आहे. गेल्यावर्षी या काळात धरणाचा साठा ७८.६१ टक्के भरला हाेता.
नागपूर शहरात आतापर्यंत ७४५.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे, जी मान्सूनच्या एकूण पावसाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक आहे. सामान्य स्तराचा पाऊस पडला असतानाही जलाशयातील साठा पुरेसा झालेला नाही. त्यामुळे नागपूर शहराला वर्षभरात मिळणाऱ्या पाण्यात कपात हाेण्याची शक्यता आहे. १७० ते १८० एम.एम.क्युब पाणी शहरासाठी आरक्षित ठेवण्यात येते.
मागीलवर्षी हाेती समाधानकारक स्थिती
मागीलवर्षी या काळात ताेतलाडाेह जलाशयात ९५.६३ टक्के, तर कामठी खैरी धरणात ९३.८० टक्के जलसाठा भरला हाेता. अनुक्रमे ९७२.४८ द.ल.घ.मी. व १३३.१८ द.ल.घ.मी. साठा हाेता. रामटेकमध्ये ३६.६१ टक्के, तर लाेअर नांदमध्ये ७१.२९ टक्के पाणीसाठा हाेता.
नागपुरातील माेठे जलाशय
बांध क्षमता वर्तमान टक्केवारी
तोतलाडोह १०१६.८८ ६५३.३९ ६४.२५
कामठी खैरी १४१.९८ ६९.४९ ४८.९४
खिंडसी १०३.०० ४०.९७ ३९.९५
लोअर नांद ५३.१८ ३३.८५ २३.५३
वडगांव १३४.८९ १०३.४२ ९३.३३