कामठी : काही महिन्यापूर्वी येथील जुनी ओळी परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींचा भुकेने मृत्यू झाला होता. अशी वेळ कुठल्याही इतर नागरिकांवर येऊ नये म्हणून तेजस संस्थेच्या वतीने एक मूठ अन्नदान हा उपक्रम कामठी शहरातील झोपडपट्टी परिसरात राबविण्यात येत असल्याची माहिती तेजस संस्थेचे अध्यक्ष व माजी सैनिक चंद्रशेखर अरगुलेवार यांनी दिली. गोरगरिबांची सेवा करणे या उद्देशाने अरगुलेवार यांनी हे कार्य स्वबळावर सुरू केले आहे. यासाठी त्यांनी शहरातील अत्यंत गरीब गरजू लोकांचा शोध घेतला. त्यांना लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याची मदत पुरविली. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. कोरोनाचा प्रकोप पाहता गरिबांनाही घरातच बंदिस्त राहणे अनिवार्य झाले. या परिस्थितीत त्यांनी जगावे कसे, हा प्रश्न अरगुलेवार यांना पडला. त्यांनी समाजभान जपणाऱ्यांशी संपर्क साधून आपण काहीतरी मदत करायला हवी असा मुद्दा मांडला. त्यानुसार तिवारी गॅस एजन्सीचे संचालक जयप्रकाश तिवारी यांच्यासह इतरांनीही सहकार्य करण्यास तयारी दर्शविली. त्याच आधारावर तेजस संस्थेच्या वतीने एक मूठ अन्नधान्य देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या कार्यात जयप्रकाश तिवारी, देवीदास पेटारे, विनोद कास्त्री, नरेश शिंदे, महेंद्र भुटानी, सुनील चोखारे, रोशन क्षीरसागर, राजू अग्रवाल, अशोक धाबोडकर, जय रामटेके आदींचे सहकार्य लाभत आहे.
कुणीही उपाशी राहू नये यासाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:09 AM