बहुतांश तिकीट मशीन बंद - नव्या खरेदीची प्रक्रिया सुरू
नागपूर : अनेक दिवसांपासून एसटी बस बंद असल्याने तिकीट मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ नव्या मशीन खरेदी करणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या एसटीच्या ८० टक्केच बस सुरू असल्यामुळे सध्या असलेल्या मशीन पुरेशा आहेत; परंतु भविष्यात पूर्णपणे बस सुरू झाल्यानंतर मशीनचा तुटवडा जाणवणार असून, पुन्हा लालपरीत तिकीट काढण्यासाठी जुन्या पंचिंग मशीन वापराव्या लागणार आहेत.
-जिल्ह्यातील एकूण एसटी बस : ४४७
-सध्या सुरू असलेल्या बस : ३७५
-तिकिटे काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन : १०६८
सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन : ३११
२) आगार/ इलेक्ट्रॉनिक मशीन/ बिघाड/ ट्रेचा वापर
अ) गणेशपेठ १८४/ ८७/ ०
ब) घाट रोड १६९/ १३२/ ०
क) इमामवाडा १५०/ ५३/ ०
ड) वर्धमाननगर १०९/ ७६/ ०
ई) उमरेड १०९/ ६०/ दोन मार्गांवर
२) दुष्काळात तेरावा महिना
-कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. उत्पन्नाचा स्रोतच बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही एसटीकडे पैसे नव्हते. अशा स्थितीत विविध सवलतींपोटी महाराष्ट्र शासनाकडे असलेली थकबाकी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देता आले. कोरोनापूर्वी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाचे उत्पन्न दररोज ४२ लाख रुपये होते; परंतु सध्या ८० टक्केच बस सुरू असल्यामुळे हे उत्पन्न २८ लाखांवर आले आहे. पूर्णपणे बस सुरू होईपर्यंत एसटीचे उत्पन्न वाढणार नसल्याची स्थिती आहे.
३) वाहकांची पुन्हा आकड्यांची जळवाजुळव
-सध्या एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात अर्ध्या तिकीट मशीन बंद आहेत; परंतु केवळ ८० टक्के बस सुरू असल्यामुळे या मशीन पुरेशा आहेत. सकाळी एका शेड्यूलला गेलेली मशीन दुपारी परत आल्यानंतर ती दुसऱ्या वाहकाला देण्यात येते. त्यामुळे सध्या नागपूर विभागात ट्रेचा वापर नगण्य आहे; परंतु पूर्णपणे बस सुरू झाल्यानंतर या मशीन कमी पडणार असून, वाहकांना पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तिकीट मशीन असल्यामुळे एका बटनावर रिपोर्ट मिळायचा; परंतु मशीन कमी पडल्यानंतर वाहकांचे काम वाढणार असून, किती तिकिटे गेली, किती पैसे मिळाले याची जुळवाजुळव त्यांना करावी लागणार आहे. अनेक वाहकांना ही जुळवाजुळव करणे डोकेदुखीचे वाटत असल्यामुळे ते मशीनसाठीच हट्ट धरत असल्याची स्थिती आहे.
४) पगार मिळतोय हेच नशीब
-सध्या एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट आहे. मे महिन्याचे जून मध्ये ७ तारखेला मिळणारे वेतन १२ तारखेला मिळाले. जूनचे ७ तारखेचे वेतन जुलैमध्ये १६ तारखेला मिळाले. त्यामुळे पगारासाठी दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. परंतु चार-पाच दिवस उशिरा का होईना, पगार मिळत आहे हेच नशीब, अशी भावना कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
सध्या तिकीट मशीन पुरेशा आहेत
‘नागपूर विभागात फक्त ८० टक्के बसद्वारे वाहतूक सुरू आहे. त्यामुळे तिकिटाच्या मशीन पुरेशा आहेत; परंतु भविष्यात पूर्णपणे बस सुरू झाल्यास काही प्रमाणात ट्रेचा वापर करावा लागेल.’
-शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, एसटी महामंडळ, नियंत्रण समिती ३, मुंबई
..........