नागपूर : सिवेजद्वारे नदी तलावात जाणाऱ्या सांडपाण्याने जलप्रदूषण वाढले आहे. मात्र या प्रदूषणामध्ये काेराेना विषाणूचाही समावेश असण्याच्या शक्यतेने भीती निर्माण केली आहे. शहरातील २५० ते ३०० वस्त्या नागनदी व पिवळी नदी काठावर वसलेल्या आहेत. जर पाण्यातून संसर्ग हाेत असेल तर या पावसाळ्यातच अनेक वस्त्यांमधील नागरिक धाेक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात घराघरातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावांसह नागनदी, पिवळी नदी व पाेहरा नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. हेच प्रदूषण पुढे कन्हान नदी व वैनगंगा नदीपर्यंत पाेहचले आहे. या प्रदूषणात मानवी शरीरातील काॅलिफाॅर्मचे प्रमाण प्रचंड आहे. अहमदाबाद येथे नदी व तलावात काेराेनाचे विषाणू आढळल्याने नागपूरबाबतही ही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दृष्टिकाेनातून विचारच झाला नसल्याचे दिसून येत आहे.
काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागपूर शहर हायरिस्कवर हाेते आणि आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आधीच नागरिक दहशतीत आहेत. त्यात सिवेजमध्ये काेराेना विषाणूचे इन्फेक्शन राहण्याच्या शक्यतेने या भीतीमध्ये आणखी वाढ केली आहे. ही स्थिती लक्षात घेता सर्व अंगाने विचार करून नदी तलावातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अगत्याचे हाेते. मात्र महापालिकेने किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था- नीरीद्वारे विविध तलाव व नद्यांच्या पाण्याची तपासणी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याविषयी अद्याप कुणी सांगण्यास तयार नाही.
गंभीर दखल घेण्याची गरज
- शहरातील अनेक भागात सिवेजचे पाणी पिण्याच्या नळलाईनमध्ये झिरपत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात.
- शहरातील ५० झाेपडपट्ट्यांसह २५० च्यावर वस्त्या नागनदी व पिवळी नदी काठावर वसल्या आहेत आणि पावसाळ्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरत असते. हेही धाेक्याचे संकेत आहेत.
- अनेक ठिकाणी या नद्यांचे पाणी शेतांमध्ये जाते. शिवाय भाजीपाला या पाण्याने धुतल्या जात असल्याचेही सांगण्यात येते.
वैज्ञानिक तथ्य काय?
- काेराेनाच्या प्रकाेपानंतर मे २०२० मध्ये स्टर्लिंग विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासात सिवेजमधून काेराेना विषाणूचा प्रसार हाेण्याची शक्यता व्यक्त करीत दुर्लक्ष करणे धाेकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली.
- विद्यापीठाचे प्रा. कुलियम यांच्यानुसार काेराेना रुग्णाकडून संसर्गित पाण्यामध्ये ३३ दिवसांपर्यंत काेराेनाचे विषाणू टिकून राहू शकतात.
- मानवी विष्ठेतून विषाणू किती पसरताे हे सांगता येत नाही पण श्वसन मार्गाने निघणाऱ्या विषाणूपेक्षा पचन मार्गाने निघणारा विषाणू अधिक काळ टिकत असल्याचे प्रा. कुलियम यांनी स्पष्ट केले.
- काेराेना डेल्टा प्लस विषाणू अधिक धाेकादायक असल्याचे व त्याचा प्रसार भारतातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशावेळी सांडपाण्यातून ताे पसरला तर किती धाेकादायक ठरेल, याचा विचार हाेण्याची गरज आहे.