लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका परिवहन सभापतींची निवडणूक न झाल्याने मागील चार महिन्यात समितीच्या बैठका बंद आहेत. यामुळे सदस्यांत असंतोष आहे. सभापतींची निवडणूक होत नसेल तर राजीनामे देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. आठवडाभरात निवडणूक न झाल्यास समितीचे सदस्य राजीनामे देणार आहेत. यामुळे प्रशासन व सत्तापक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून निवडणुकीला हिरवी झेंडी मिळताच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी दर्शविण्यात आली; परंतु यासाठी मनपा प्रशासनाला निवडणुकीसाठी पत्र पाठवायचे आहे. यापूर्वी मनपा आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र जारी करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा पत्र काढायचे की नाही. यावर अधिकाऱ्यांचे मंथन सुरू आहे. जोपर्यंत मनपा प्रशासनाकडून पत्र जारी होणार नाही. तोपर्यंत निवडणूक होणार नाही.
स्थायी समिती प्रमाणे परिवहन समितीला संवैधानिक अधिकार आहेत. परंतु सभापतीची निवडणूक न झाल्याने बैठक घेता येत नाही. कोरोना कालावधीत परिवहन विभागाकडे दुर्लक्ष झाले. समितीत १३ सदस्य आहेत. यात स्थायी समिती अध्यक्ष पदसिद्ध सदस्य आहेत. समितीत १० सदस्य भाजपाचे तर दोन काँग्रेसचे आहेत. बैठक होत नसल्याने भाजपचे सदस्य नाराज आहेत; परंतु त्यांना बोलता येत नाही.
.......
सदस्यांना बाजू मांडता येत नाही
काँग्रेसचे नगरसेवक व समिती सदस्य नितीन साठवणे यांनी समितीच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. सभापती नसल्याने सदस्यांना आपली बाजू मांडता येत नाही. परिवहन विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
..
प्रशासनाला पत्र पाठवावे लागेल
निवडणुकीसंदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत. लवकरच निवडणूक प्रक्रिया होईल. मनपा प्रशासनाला विभागीय आयुक्तांना पत्र पाठवावे लागेल. त्यानंतरच ही प्रक्रिया होईल. अद्याप आयुक्तांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी सांगितले.