नागपूर : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना सील करून पोलीस दंड वसूल करणार आहेत. राज्य शासनाने प्रतिष्ठानांना सील करून दंड वसूल करण्याचे अधिकार दिल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकारी आणि ठाणेदारांना याबाबत आदेश दिले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, कोरोनाच्या नियमानुसार हॉटेल-रेस्टॉरंट क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना प्रवेश देऊ शकतात. तसेच मंगल कार्यालयात लग्न आणि दुसऱ्या समारंभासाठी केवळ ५० जण उपस्थित राहू शकतील. या नियमांचे कठोरपणे पालन करून घेण्यासाठी पोलिसांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रतिष्ठानला सील करून पोलीस १० हजार रुपये दंड वसूल करु शकतात. त्यासोबतच प्रतिष्ठानच्या मालकाविरुद्ध कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
हॉटेल-रेस्टॉरंट किंवा मंगल कार्यालयांना दर्शनीय स्थळी प्रतिष्ठानची क्षमता आणि प्रवेश दिलेल्या व्यक्तींची संख्या लिहिणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास पोलीस कारवाई करतील. या आधी महापालिकेला सील आणि दंड वसूल करण्याचे अधिकार होते. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने पोलिसांना अधिकार दिले आहेत. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, हॉटेल-रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक सतत देखरेख करणार आहे. हॉटेल-रेस्टॉरंट रात्री १२ वाजता तर मंगल कार्यालय रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहतील.
शांतीनगर ठाण्याचे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रॅपिड अँटिजन चाचणी सुरु करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह डिलीव्हरी बॉय, व्हेंडर आदींवर नजर ठेवण्यात येत आहे. या व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतात. पोलीस ठाण्यांशिवाय गुन्हे शाखा, वाहतूक शाखेलाही कोरोना रोखण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
..............